हायलाइट्स:
- ग्रामीण भागात आता शाळा सुरू
- शिक्षकांवरील जोखमीचं काम अद्यापही कायम
- विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात?
करोनाचा संसर्ग वाढल्यानंतर शाळाही बंद करण्यात आल्या होत्या. त्यावेळी करोनासंबंधीच्या उपाययोजनांची कामे करण्यात मनुष्यबळ अपुरे पडत होते. त्यामुळे शिक्षकांची मदत घेण्यात आली. गावात येणाऱ्यांचं विलगीकरण करण्यापासून स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्यापर्यंतची विविध कामे शिक्षकांवर सोपवण्यात आली होती. करोनाचा प्रभाव कमी होऊन आता शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, अनेक ठिकाणी शिक्षकांना लावण्यात आलेली करोना ड्युटी रद्द करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षकांना या कामासाठी जावे लागत आहे.
सध्या ओमिक्रॉनच्या संबंधी उपाययोजना कडक करण्यात आल्या आहेत. त्यासाठी परदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी आणि विलगीकरणापर्यंत पाठवण्याची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी या कामांसाठी शिक्षकांची मदत घेण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात हे काम प्राथमिक शिक्षकांवर सोपवण्यात आलं आहे. यामुळे शिक्षकांच्या माध्यमातून थेट शाळेतील विद्यार्थ्यांना करोनाचा संसर्ग होण्याची जोखमी असल्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.
अनेक तालुक्यांत परदेशातून आलेल्या या व्यक्तींचा शोध घेणे, त्यांचे नमुने घेण्याची व्यवस्था करणे, त्यासाठी त्यांना आरोग्य केंद्रावर नेणे, तेथून विलगीकरण कक्षापर्यंत नेणे, त्याचा अहवाल प्रशासनाला देणे अशी कामे तालुका पातळीवर प्राथमिक शिक्षकांवर सोपवण्यात आलेली आहेत. पूर्वी शाळा बंद होत्या. त्यामुळे ही जोखमी शिक्षकांपर्यंतच मर्यादित होती. आता ती थेट शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोहचली आहे.
एका बाजूला शिक्षकांचे लसीकरण, त्यांची ४८ तास आधीची चाचणी वगैरे नियम केले जात आहेत. विद्यार्थ्यांना धोका होऊ नये म्हणून त्यांना दीर्घकाळ शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. दुसरीकडे धोका वाढलेला असताना शिक्षकांना जोखमीचं काम देण्यात आलं आहे. शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांना देण्यात आलेली करोनासंबंधीची ड्युटी रद्द होणे आवश्यक होते. नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अद्याप त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. हे काम देण्याची आणि रद्द करण्याची जबाबदारी त्या त्या तालुक्यातील तहसीलदारांची आहे. असं असलं तरी अनेक ठिकाणी शिक्षकांना दिलेले हे काम रद्द करण्यात आले नाही.
दरम्यान, याबाबत शिक्षक नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. डॉ. संजय कळमकर म्हणाले की, ‘शाळा बंद होत्या, तेव्हा शिक्षकांनी स्वत: चा जीव धोक्यात घालून अशी कामे केली आहेत. मात्र, आता शाळा सुरू झाल्याने शिक्षकांसाठी नाही, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षकांचे हे काम बंद केलं पाहिजे. एखादा शिक्षक बाधित झाला तर खूप मोठा धोका संभवतो. दीड वर्षे शाळा बंद होत्या. त्यामुळे अभ्यास बुडाला आहे. आता तरी शिक्षकांना पूर्णवेळ अध्यापनाचे काम करू दिले पाहिजे.’