हायलाइट्स:
- पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही ओमिक्रॉनबाधित रुग्ण
- ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या राज्यात आठपर्यंत पोहोचली
- बाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेल्या ओमिक्रॉन रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने या संदर्भात सायंकाळी माहिती दिली.
पुणे शहरातील ओमायक्रॉनबाधित रुग्ण नेहमीच्या सर्वेक्षणात आढळला असून हा रुग्ण १८ ते २५ नोव्हेंबर काळात फिनलंड येथे गेला होता. २९ तारखेला थोडासा ताप आला म्हणून त्याची चाचणी केली असता त्याला करोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं.
पिंपरी चिंचवडमध्ये एकाच कुटुंबातील ६ बाधित
नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून भावाला भेटण्यासाठी आलेली ४४ वर्षांची महिला, तिच्यासोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली अशा एकूण सहा जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यांमध्ये ‘ओमिक्रॉन’ विषाणू सापडल्याचा अहवाल पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) रविवारी संध्याकाळी दिला आहे. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची एकूण संख्या आठपर्यंत पोहोचली आहे.
दरम्यान, Omicron किंवा करोनाचा नवा व्हेरिएंट आधीच्या इतर व्हेरिएंटपेक्षा अधिक घातक असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. त्यातच पुणे जिल्ह्यात आता ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाला अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.