हायलाइट्स:
- ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप
- कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळांची फटकेबाजी
- अप्रत्यक्षपणे लगावला फडणवीसांना टोला
‘साहित्य संमेलन नाशिकला झाले याचा मनस्वी आनंद आहे. पुढचं साहित्य संमेलन कुठे होईल हे माहीत नाही. परंतु पुढील संमेलन देखील नाशिकला व्हावे ही इच्छा आहे. म्हणून सर्व साहित्यिकांना विनंती आहे की नाशिकलाच येत चला, योग्य ठिकाण आहे आणि साहित्यिकांचं गाव आहे. आम्ही सेवक आहोत. आपण परत या, मी पुन्हा येईल असं म्हटलं की गडबड होते, म्हणून आम्ही सांगतो आपण परत या,’ असं म्हणत छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे चिमटा काढला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात ‘मी पुन्हा येईन’ हे फडणवीस यांचं वाक्य चांगलंच गाजलं होतं. यावरून सोशल मीडियावर अनेक मिम्स देखील तयार झाले होते. या वाक्याची आठवण करून देत पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
‘कार्यक्रम संपल्यावर चुकल्या-चुकल्यासारखं वाटेल’
नाशिक शहरात सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी समारोप झाला. या कार्यक्रमाला राज्यभरातील अनेक दिग्गज साहित्यिक आणि राजकीय नेतेही उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, ‘साहित्य संमेलनात अनेक हात राबले. दोन-तीन आमदार सोडल्यास सर्वच आमदारांनी १०-१० लाख रुपये आमदार फंडातून दिले. महाराष्ट्र साहित्य मंडळाने आम्हाला आयोजनाची संधी दिली. यावेळी ९४३ कवींचे कविता वाचन झाले. सिंगापूर, दुबई, हैदराबाद आदी ठिकाणाहून कवी आले. देशाबाहेर पाकिस्तानात सुद्धा कार्यक्रम बघितला गेला. कार्यक्रम संपल्यावर चुकल्या चुकल्यासारखं वाटेल,’ अशा शब्दांत भुजबळ यांनी आपल्या भावना मांडल्या.