हायलाइट्स:

  • मराठी साहित्य संमेलन काही वादांमुळे चर्चेत
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव साहित्य नगरीला न दिल्याने अनेकांची नाराजी
  • शरद पवार यांनी वादावर केलं भाष्य

नाशिक : नाशिक येथे पार पडलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन काही वादांमुळे चर्चेत राहिले. साहित्य नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची मागणी अमान्य करण्यात आल्याने टीका झाली. या पार्श्वभूमीवर संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वादावर भाष्य केलं आहे. (शरद पवार न्यूज अपडेट)

‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाबद्दल चर्चाच होऊ शकत नाही. त्यांचं साहित्य अजरामर आहे. सावरकर हे विज्ञानवादी होते. सावरकरांच्या नावाला विरोध कोणी करूच शकत नाही आणि यावर चर्चा होणंही योग्य नाही,’ अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. कुसुमाग्रज यांचं नाव साहित्य नगरीला दिलं गेलं हे अगदी योग्य आहे, असंही पवार म्हणाले.

साहित्य संमेलन : मी पुन्हा येईन म्हटलं की गडबड होते; भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं!

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘मराठी भाषेबाबतच्या अडचणी समजून घेण्यासाठी नुकतंच मी राज्याच्या मुख्य सचिवांना भेटलो होतो. ते आता मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागारही आहेत. मराठी भाषेबाबत निर्माण होत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी एकत्र बसून चर्चा करायचं ठरलं आहे,’ अशी माहितीही पवार यांनी यावेळी दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती नाराजी

भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील साहित्य नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव न दिल्याने नाराजी व्यक्त करत साहित्य संमेलनाला उपस्थित राहणं टाळलं होतं. ‘केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवी, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, व्याकरणकार, इतिहासकार आणि मराठीला अनेक शब्द देणारे अशी सावरकरांची ख्याती आहे. त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट का?,’ असा सवाल उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here