हायलाइट्स:
- तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या जीवाला धोका
- बॉम्बस्फोटाद्वारे उडवून देण्याचा प्रयत्न
- पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा प्रसंग टळला
तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी देशाच्या आग्नेय प्रांतातील सिरट भागात एर्दोगन यांच्या ताफ्यात तैनात करण्यात आलेल्या एका गाडीतून बॉम्ब जप्त केला आहे. उल्लेखनीय म्हणजे ही गाडी एका पोलीस अधिकाऱ्याची आहे. ही गाडी राष्ट्रपतींच्या ताफ्यात दाखल होणार होती.
एर्दोगन हे सिरत इथं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दाखल झाले होते. हा बॉम्ब पोलिसांच्या सुरक्षा ताफ्यात सामील असलेल्या एका पोलीसाच्या गाडीखाली लावण्यात आला होता. मात्र, पोलीस अधिकाऱ्याच्या एका मित्राला गाडीच्या खाली काहीतरी लावण्यात आल्याचं लक्षात आल्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत हा बॉम्ब असल्याचं स्पष्ट झालं.
परिस्थिती ध्यानात आल्यानंतर ताबडतोब पोलिसांच्या बॉम्बस्क्वॉडनं हा बॉम्ब त्वरीत बॉम्ब निकामी केला. फॉरेन्सिक तज्ज्ञ बॉम्बची अधिक तपासणी करत आहेत. यासोबतच, पोलिसांच्या वाहनातील बोटांच्या ठशांवरून गुन्हेगारांचा शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र, या घटनेत अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
तुर्कस्तानची कमकुवत अर्थव्यवस्था
देशाची अर्थव्यवस्था रसातळाला पोहोचली असताना आणि राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांना यासाठी देशभरातून टीका सहन करावी लागत असताना, तुर्की पोलिसांनी हा खुलासा केलाय. मात्र, ही घटना समोर आल्यानंतरही एर्दोगन आपल्या निश्चित वेळी कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांनी आपल्या भाषणात देशात दहशतवादाला जागा नसल्याचं म्हटलंय.
२०१६ सालीही एर्दोगन यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
उल्लेखनीय म्हणजे, तुर्कस्तानात यापूर्वीही २०१६ साली राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. एर्दोगन सुट्टीचा आनंद घेत असताना हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं ५० बंडखोर घटनास्थळी पोहचले होते. मात्र, हल्लेखोरांची चाहूल लागताच एर्दोगन तिथून पसार झाले. या प्रकरणात तुर्कस्तानच्या न्यायालयानं ४० जणांना आजीवन तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांत माजी सैनिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश होता.
वाचा : व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर; पाकिस्तानची धडधड वाढली