हायलाइट्स:
- वर्षभरापूर्वी अतिक्रमण काढण्याचं आश्वासन
- मात्र प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही नाही
- महापालिका इमारतीसमोर केक कापून केला निषेध
जळगाव शहरातील अनेक मुख्य रस्त्यावरील व्यापारी संकुले व गाळेधारकांनी बेकायदेशीरपणे बेसमेंटचा दुरुपयोग केला आहे. मुख्य रस्त्यांवर असलेल्या या व्यापारी संकुलांना तसंच गाळेधारकांना देखील बेसमेंट ही पार्किंगसाठी बंधनकारक असताना या व्यापाऱ्यांनी बेकायदेशीरपरणे या जागेचा वापर व्यवसायासाठी तसंच गोडाऊनसाठी केला आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर वाहने लावण्यासाठी पार्किंगची सुविधा नसल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होते. महापालिका प्रशासनाच्या नगररचना विभागाने दोन वर्षांपूर्वी या रस्त्यांवरील बेसमेंटचे सर्व्हेक्षण केले आणि अशा १३३ बांधकामांची यादी तयार केली. त्यातील ३७ प्रकरणांची सुनावणी घेऊन त्यांना सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानतंर मात्र, कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.
याबाबत मागील वर्षी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी निषेध करून बेसमेंटमधील अतिक्रमण काढण्याची मागणी महापालिका प्रशासनाला केली होती. यावेळी जळगाव महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त संतोष वाहुळे यांनी बेसमेंटमधील अतिक्रण काढण्यासाठी नगररचना विभाग सुनावणी घेवून सकारण आदेश काढून धोरण निश्चित करेल असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला आज एक वर्ष पूर्ण होवून देखील महापालिका प्रशासनाने कुठलीच कारवाई न केल्याने दीपक गुप्ता महापालिका प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी गांधीगिरी स्टाइलने आंदोलन केले.
न पाळलेल्या आश्वासनाचा वाढदिवस
मनपाने दिलेल्या पण न पाळलेल्या आश्वासनाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. लेखी आश्वासनाचे पत्र लावलेला केक गुप्ता यांनी महापालिकेत आणला. त्यांनी तो केक आयुक्त सतिष कुळकर्णी यांच्या दालनात जावून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुळर्णी यांनी बेसमेंटमधील अतिक्रमण काढण्याचे आश्वासन देत केक नाकारला. त्यामुळे गुप्ता यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर महापौर जयश्री महाजन यांना अडवून त्यांच्याकडेही प्रशासनाचे गाऱ्हाणे मांडले. त्यांनी देखील याबाबत लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं. त्यानतंर गु्प्ता यांनी मनपासमोरच हा केक कापून आश्वासन न पाळण्याचे दुख साजरे केलं. तसंच तात्काळ बेसमेंटमधील अतिक्रमणे काढण्याची मागणी केली.