नागालँडमध्ये सुरक्षा दलांच्या गोळीबारात एकूण १६ नागरिकांच्या मृत्यू झाल्याची माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत निवेदनातून दिली. अमित शहा यांनी आधी लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत निवेदन दिलं. नागालँडमधील तिरू गावाजवळ दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. त्याआधारे कमांडो पथकाने ४ डिसेंबरला संध्याकाळी सापळा लावला होता. यादरम्यान एक वाहन तिथून गेले. त्या वाहनाला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाहन थांबण्याऐवजी ते वेगाने जाऊ लागले. यामुळे वाहन संशयित बंडखोरांना घेऊन जात असल्याच्या संशय जवानांना आला. यातूनच त्यांनी वाहनावर गोळीबार केला. यात वाहनातील ८ पैकी ६ जण ठार झाले. हे मजूर आहेत आणि चुकीची ओळख झाल्याचं समजल्यानंतर जखमींना झालेल्या दोघांना लष्कराने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती शहांनी दिली.
‘ही बातमी कळल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी लष्कराच्या तुकडीला घेराव घातला. लष्कराची दोन वाहने जाळून त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे एका सुरक्षा दलाच्या जवानाचा यात मृत्यू झाला तर इतर अनेक जवान जखमी झाले. स्वत:चे रक्षण करण्यासाठी आणि जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना गोळीबार करावा लागला. ज्यामुळे आणखी ७ नागरिकांचा मृत्यू झाला आणि काही जण जखमी झाले. तेथील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात आहे, असे अमित शहांनी सांगितले.
नागालँड घटनेवर काँग्रेसची ४ सदस्यांची समिती
दरम्यान, नागालँडच्या घटनेवर काँग्रेसने ४ सदस्यांची एक समिती तयार केली आहे. ही समिती नागालँडचा दौरा करेल आणि मोन जिल्ह्यात जाऊन नागरिक आणि हिंसाचाराशीसंबंधी घटनांवर एक अहवाल तयार करेल. ४ सदस्यांची ही समिती एका आठवड्यात काँग्रेसच्या अध्यक्षांना आपला अहवाल सादर करेल, असे सांगण्यात आले आहे.