हायलाइट्स:

  • जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत शिवेंद्रराजेंची रणनीती अयशस्वी
  • शशिकांत शिंदेंनी दिली आक्रमक प्रतिक्रिया
  • वेळ पडल्यास जावली मतदारसंघात आव्हान देण्याचीही तयारी

सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने नितीन जाधव पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना शह दिला. जिल्हा बँकेचं अध्यक्षपद मिळावं यासाठी शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेटही घेतली होती. मात्र शिवेंद्रराजेंची रणनीती अयशस्वी झाली आणि राष्ट्रवादीने आपल्याच पक्षातील व्यक्तीकडे अध्यक्षपद देणं पसंत केलं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजेंना टोला लगावत जोरदार फटकेबाजी केली आहे. (शशिकांत शिंदे सातारा)

‘माझी शिफारस नसल्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत,’ असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला आहे. जिल्हा बँकेचे निवनिर्वाचित अध्यक्ष नितीनकाका पाटील यांना शुभेच्छा देत शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे की, ‘जिल्हा बँकेत नेहमीच पक्षविरहीत कामकाज चालतं. दिवंगत लक्षमणतात्या पाटील यांनी कायम पक्षाशी बांधिलकी ठेवत शरद पवार यांच्या विचारांची पाठराखण केली होती. त्यामुळे त्यांच्या मुलाला अध्यक्ष बनवलं याचा आम्हाला आनंदच असून कार्यकर्त्यांनाही समाधान झालं असेल,’ असं ते म्हणाले.

ओबीसींचे अहीत करणारी अदृश्य शक्ती राज्यात उभी; ते दोन महाभाग कोण?; वडेट्टीवारांना शंका

…म्हणून शरद पवारांनी घेतला निर्णय

‘माझ्या पराभवानंतर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या आणि याच भावना ओळखून पवारसाहेबांनी नितीन पाटील यांना अध्यक्ष बनवलं. मी निवडून आलो असतो तर शिवेंद्रराजेंची शिफारस पवार साहेबांकडे करु शकलो असतो. याआधी शिवेंद्रराजे भोसले हे अध्यक्ष झाले होते, तेव्हाही पवार साहेबांकडे मीच शिफारस केली होती. यावेळी माझाच पराभव झाल्यामुळे माझ्यासारख्याची शिफारस कमी पडली आणि त्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत,’ असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी लागावला. तसंच शरद पवार यांना मी शिवेंद्रराजेंना अध्यक्ष करु नका असं कधीच सांगितलं नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्याच्या हत्येचे काही तासातच गूढ उकलले; मित्राला अटक!

पुन्हा शिवेंद्रराजेंना आव्हान

शशिकांत शिंदे आणि सातारा-जावली मतदारसंघाचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील संबंध मागील काही वर्षांपासून ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत. ‘सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी टिकवायची आणि वाढवायची असेल तर जिल्ह्यातील नेत्यांना एकत्र येऊन काम करावं लागेल. जिल्ह्यात पक्ष टिकवण्यासाठी मी वाट्टेल ते करायला तयार आहे, फक्त पक्षाने आदेश दिला पाहिजे. पक्षाने सांगितलं तर मी सातारा-जावली मतदारसंघातही रान पेटवायला तयार आहे,’ अशा शब्दांत शशिकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवेंद्रराजेंना आव्हान दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here