पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे निधन – ashok godse, president of shrimant dagdusheth halwai ganpati trust in pune has passed away
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव प्रतापराव गोडसे यांचं निधन झालं आहे. यकृताच्या कर्करोगासंदर्भात त्यांच्यावर मागील दोन आठवड्यांपासून ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, १ मुलगी, १ मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर)
अशोकराव गोडसे हे सुमारे ५० ते ५५ वर्ष ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत होते. सन २०१० पासून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष होते. तसंच सुवर्णयुग सहकारी बँकेवर संचालकपदी देखील त्यांनी काम केले होते. अशोक गोडसे यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या माध्यमातून मानवतेचे महामंदिर ही संकल्पना रुजवत अनेक सामाजिक उपक्रमही राबवले. Breaking news मोठी चिंताजनक बातमी; मुंबईत अखेर ओमिक्रॉनचा शिरकाव, दोघांना झाली लागण
जय गणेश ज्ञानवर्धन अभियान, जय गणेश रुग्ण सेवा अभियान, जय गणेश संपूर्ण ग्राम अभियान, जय गणेश आपत्ती निवारण अभियान, जय गणेश जलसंवर्धन अभियान, जय गणेश निसर्ग संवर्धन अभियान या ट्रस्टच्या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
दरम्यान, अशोक गोडसे यांनी १९६८ साली सुवर्णयुग तरुण मंडळाचे प्रमुख संघटक म्हणून सुरुवात केली. सन १९९६ मध्ये ते सुवर्णयुग तरुण मंडळाचे विद्यमान संचालक होते. सन २००१ मध्ये ट्रस्टच्या विश्वस्तपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर २०१० मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यापासून ते ट्रस्टवर कार्यरत होते. दरवर्षी होणाऱ्या गणेशोत्सव सजावटीच्या संकल्पनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.