जगात आईच्या प्रेमाला कुठलीही उपमा नाही. आपल्या लेकरासाठी ती प्रत्यक्ष मृत्यूशीही झुंज द्यायला मागेपुढे पाहात नाही. नेमकी अशीच घटना मांगुर्डी शेतशिवारातील शेतात घडली. जयवंत बोपटे यांच्या शेतात कापूस फुटल्याने त्यांनी पत्नी कल्पना, मोठी मुलगी रिद्धीमा (१०), लहान भाऊ सहयोग (६) व अदिती (८) असे तिघेजण कापूस वेचायला शेतात आले. तीन मुली घरी ठेऊन जयवंत पांढरकवड्याला बाजाराला गेले होते. दरम्यान, शेतातील कामात कल्पना मग्न असतांना अदितीला तहान लागली. तहानेने व्याकुळ ही चिमुकली भाऊ सहयोगला घेऊन शेतातीलच विहिरीजवळ गेली. तिथे पाणी काढताना तिचा तोल घसरून ती विहिरीत पडली.
यावेळी अदितीसह सहयोगनेही आरडाओरड केल्याने आणि कल्पना आणि रिद्धीमा दोघीही विहिरीच्या दिशेने धावल्या. यावेळी कल्पनाने विहिरीत पडलेल्या अदितीला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, तिचाही तोल जाऊन ती विहिरीत पडली. यावेळी रिद्धीमा आपल्या डोळ्यादेखतच आई व बहिण विहिरीत बुडत असल्याचे पाहून भांबावली. जीवाच्या आकांताने ती धावतच शेतापासून २० मीटर अंतरावरील डांबरी रस्त्यावर पोहोचली.यावेळी रस्त्यावरील एका दुचाकीस्वाराला तिने अडविले. घडलेली आपबिती त्याला सांगितल्याने हा दुचाकीस्वारही घटनास्थळी पोहोचला. मात्र, तोवर बराच उशीर झाला होता.
त्याने रिद्धीमाला सोबत घेऊन मांगुर्डा गाठुत घटनाक्रम ग्रामस्थांना सांगितला. त्यावरून ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठन विहिरीत बुडालेल्या मायलेकींना बाहेर काढले. या घटनेमुळे संपूर्ण गावावरच शोककळा पसरली. या घटनेची माहिती मिळताच पांढरकवड्याचे ठाणेदार जगदीश मंडलवार, फौजदार नीलेश गायकवाड, संदीप बारींगे, शिपाई राजेश सुरोशे, चांदेकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच आई व मुलीची आत्महत्या की तोल जाऊन पडल्या याची खातरजमाही केली.