हायलाइट्स:
- चौकात झेंडा लावण्यावरून तणाव
- दोन गट समोरासमोर येऊन दगडफेक
- पोलिसांच्या एण्ट्रीनंतर परिस्थिती नियंत्रणात
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झेंडा लावण्यावरून गेल्या दोन-चार दिवसांपासून वाद सुरू आहे. पोलिसांनी वाद टाळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नगर तालुका पोलrस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सानप यांनी गावात जाऊन बैठक घेतली. गावकरी या बैठकीला उपस्थित होते. वाद न वाढवण्याचं तिथं ठरवण्यात आलं. मात्र,चौकात झेंडा लावायचाच असेल तर दोन्ही झेंडे लावावेत असंही काहींचं मत होतं. त्यानुसार दुसरा झेंडा घेऊन येण्याची तयारी सुरू असतानाच मतभेद वाढत गेले. दोन गट आक्रमक होत समोरासमोर आले. काहींनी दगडफेकही केली. त्यामुळे गावात आणि रस्त्यावर धावपळ सुरू झाली.
गावात आधीपासूनच काही पोलिसांचा बंदोबस्त होताच. आणखी पोलीस बळ बोलावण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी धावून आले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, गावातील दुकाने बंद करण्यात आली. इतरही व्यवहार बंद करण्यात आले. जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यानंतर काहींची धरपकड सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. मधल्या काळात दौंड रस्त्यावरील वाहतूक विस्कळी झाली होती. सध्या गावात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही अफवा पसरवून नयेत. अफवांना बळी पडू नये, सोशल मीडियातून आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.