हायलाइट्स:
- जळगाव महापालिकेतील नगरसेवकांच्या अडचणी वाढल्या
- घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेल्यांचे पद जाणार?
- मुंबई हायकोर्टाने शिक्षेला स्थगितीचा अर्ज फेटाळला
भगत बालाणी, दत्तू कोळी, कैलास सोनवणे व सदाशिवराव ढेकळे या नगरसेवकांनी पद जाणार असल्याने घरकुल घोटाळ्यात देण्यात आलेल्या शिक्षेसंदर्भात न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळल्यामुळे या नगरसेवकांचे नगरसेवकपद जाणार असून विभागीय आयुक्तांकडून याबाबत लवकरच कार्यवाही होण्याची शक्यता आहे.
न्यायालयात नेमकं काय घडलं?
घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेल्या नगरसेवकांनी केलेल्या अर्जावर सुनावणी सुरू असताना विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी जोरदार युक्तीवाद केला. तसंच नगरसेवकांनी केलेल्या अर्जावर हरकत नोंदवली.
‘घरकुल घोटाळ्यात जो गुन्ह्याचा कट होता तो अंमलात आणण्यासाठी इतर आरोपींप्रमाणे अर्ज करणार्या संबंधित नगरसेवकांनीही मदत केली. जमीन ताब्यात नसताना आर्टिटेक्टची नेमणूक केली. नगरपालिका कर्जबाजारी असताना, तसंच कर्ज मंजुर झालेलं नसतानाही ठेकेदारांना बेकायदेशीर ठेका दिला. ठेका दिल्यानंतर सर्व पैसा हा सुरेश जैन यांच्या खात्यात जमा झाला. तसंच नऊ महिन्यात ११ हजार ४२४ घरांचे बांधकाम होणं अपेक्षित होतं. ते केलं नाही म्हणून ठेकेदारावर दंड आकारण्याऐवजी त्याला दोन वर्षांची मुदतवाढ दिली. त्यानंतर पुन्हा तीन वर्षांची मुदतवाढ दिली. अॅडव्हान्सेस म्हणून बेकायदेशीरपणे रकमा दिल्या. अशाप्रकारे गुन्ह्यात संबंधित अर्ज करणार्या चारही नगरसेवकांचा लक्षणीय सहभाग घेत त्यांनी भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे नैतिकतेच्या दृष्टीने या गुन्ह्यात भ्रष्टाचाराच्या अंतर्गत कायद्यानुसार आरोपींना शिक्षा झालेली आहे,’ असं अॅड. प्रवीण चव्हाण यांनी आपल्या युक्तीवादात म्हटलं. त्यानंतर हा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने नगरसेवकांचे अर्ज फेटाळले आहेत.