हायलाइट्स:

  • रोहित पवार आणि निलेश लंके यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा
  • भाजपकडून चर्चेची खिल्ली उडवण्यास सुरुवात
  • खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला टोला

अहमदनगर : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ‘एक-दोन नव्हे तर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्वच आमदारांना मंत्रिपद द्या, एवढंच नाही तर नगरला मिनी मंत्रालयही बांधा,’ अशी उपरोधिक मागणी केली आहे. (Sujay Vikhe Patil Latest News)

राज्यात सध्या नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. रोहित पवार यांच्या मतदारसंघातील कर्जत आणि निलेश लंके यांच्या मतदारसंघातील पारनेर नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत अन्य मुद्द्यांसोबतच मंत्रिपदाचा मुद्दा चर्चेत आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्यामध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून पवार आणि लंके यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा त्या त्या तालुक्यांत सुरू आहे. अर्थात त्याला कोणताही दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे भाजपकडून या चर्चेची खिल्ली उडवण्यास सुरुवात झाली आहे.

Sanjay Raut: राहुल भेटीनंतर राऊतांनी सस्पेन्स वाढवला; उद्धव ठाकरेंनी परवानगी दिली तर…

यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार डॉ. विखे म्हणाले की, नगर जिल्ह्याला अतिरिक्त मंत्रिपदांची गरज आहेच. त्यामुळे एक दोन कशाला, महाविकास आघाडीच्या सर्वच सहा आमदारांना मंत्रिपद द्यावं. एवढंच नाही, तर नगरला मिनी मंत्रालय बांधावं. मंत्रिपद मिळालं की विकासाचा प्रश्न मार्गी लागेल. हे मंत्री आपापल्या भागातील प्रश्न सोडवतील याचा जिल्ह्याला फायदा होईल. त्यामुळे भारतीय जनता पार्टीतर्फे आमची मागणी आहे की, जिल्ह्यात सहा मंत्रीपदे द्यावीत. विकासापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्याला याचा फायदा होईल. यासाठी त्या मंत्र्यांना आमच्या शुभेच्छा, असंही विखे पाटील म्हणाले.

खासदार सुजय विखे पाटील यांनी आज नगर अर्बन बँकेला भेट दिली. बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा त्यांनी सत्कार केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘अर्बन बँकेवर निर्बंध आले आहेत, असं कळलं असलं तरी नियोजित कार्यक्रमानुसार मी बँकेत आलो आहे. बँकेचं कामकाज सुरळीत झालं असताना अचानकपणे बँकेवर निर्बंध येणं ही दुर्दैवी बाब आहे. पण मला विश्वास आहे की अर्बन बँक पुन्हा सुस्थितीत येईल. बँकेला म्हणणे मांडण्याची संधी मिळावी, यासाठी लवकरात लवकर आरबीआयच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन अर्बन बँकेची बाजू मांडणार आहे. खासदार म्हणून मी अर्बन बँकेला पूर्ण सहकार्य करीन. माझ्या यशात स्वर्गीय माजी खासदार दिलीप गांधी यांचं मोठं योगदान आहे. त्यांनी केलेल्या सहकार्याची परतफेड करण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे अर्बन बँकेला पूर्ण सहकार्य करू,’ असं आश्वासन विखे पाटील यांनी दिले.

दरम्यान, बँकेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल व उपाध्यक्ष दीप्ती गांधी यांनी डॉ. विखे यांचे स्वागत केलं. याप्रसंगी सहकार पॅनेलचे नेते सुवेंद्र गांधी, ज्येष्ठ संचालक अशोक कटारिया, अनिल कोठारी, शैलेश मुनोत, अजय बोरा, मनीष साठे, कमलेश गांधी, ईश्वर बोरा, राहुल जामगावकर, संपतलाल बोरा, गिरीश लाहोटी, बँकेचे मुख्य व्यवस्थापक सतीश रोकडे, प्रमुख व्यवस्थापक एम. पी. साळवे, वरिष्ठ अधिकारी सुनील काळे, माजी नगरसेवक धनंजय जाधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here