हायलाइट्स:
- कोल्हापूरमध्ये दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य
- वृद्ध महिलेला लिफ्ट देऊन नंतर लुटलं
- पोलिसांनी आरोपी दाम्पत्याला केली अटक
मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी मलकापूर इथं मंगल ज्ञानदेव कुंभार (वय ५२, रा. कुंभार गल्ली, मलकापूर, ता. शाहूवाडी) या कोल्हापूरला येण्यासाठी एसटीची वाट पाहात होत्या. त्याचवेळी कोल्हापूरकडे जाणारी एक कार त्यांच्याजवळ थांबली. कारमधील पुरुष आणि महिलेनं कुठं जाणार आहे असं विचारलं आणि वृद्ध महिलेला लिफ्ट दिली. मंगल कुंभार कारमध्ये बसल्या आणि त्यानंतर थोड्या वेळाने पती-पत्नीने मंगल कुंभार यांना जीव मारण्याची धमकी देऊन त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. तसंच मोबाईलही काढून घेतला. त्यानंतर महिलेला केर्ली फाट्यावर सोडून दिले. याप्रकरणी कुंभार यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. पोलीस तपास करत असताना मंगल कुंभार यांना सलमान मुबारक खान तांबोळी आणि त्याची पत्नी आयेशा (रा. शिवजल सिटी, नाईक बोमवाडी, ता. फलटण, जि. सातारा) यांनी लुटल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आयेशा तांबोळी ही माहेरी वडील जमीर बाबासाहेब पठाण (रा.मणेर मळा, उचगाव, ता. करवीर, कोल्हापूर) यांच्या घरी येणार असल्याचे माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तांबोळी दाम्पत्याला उचगाव येथून ताब्यात घेतले. दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी चोरीचे दागिने, गुन्ह्यातील कार असा सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार असिफ कलायगार, सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, अनिल जाधव, वैशाली पाटील, रणजीत पाटील, संतोष पाटील, अमर वासुदेव,सरेश राठोड यांनी गुन्ह्याचा तपास केला.