याआधीच तीन प्रभाग पद्धत रचना, ओबीसी आरक्षण आणि निवडणुकीसंदर्भात न्यायालयात दाखल केलेली याचिका अशा विविध कारणांमुळे पालिका निवडणूक लांबणीवर जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती. मात्र २९ नोव्हेंबर रोजी पालिका आयुक्तांनी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा तयार करुन राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. त्यामुळे निवडणुका ठरलेल्या वेळेत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र त्यातच करोनाच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटमुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.
नाशिक शहरात अद्याप या विषाणूची लागण झालेला रुग्ण सापडला नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेची वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अशा वातावरणात आगामी पालिका निवडणुका घेण्याचा धोका प्रशासन पत्करणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नाशिक महानगरपालिकेची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपत असल्याने फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता सुरुवातीला वर्तवण्यात येत होती. मात्र पालिका निवडणूक मुदतीत होण्यास सुरुवातीपासूनच विविध अडचणी येत असल्याचं दिसत आहे. नवीन आलेल्या करोना विषाणूने जगभरातल्या आरोग्य संघटना चिंताग्रस्त आहे. भारतातही या विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडू शकतात.
दरम्यान, निवडणुका होणार की नाही, याबाबतचे नेमके चित्र पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होईल. त्यामुळे प्रशासनाकडून निवडणुकांच्या संदर्भात काय निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.