हायलाइट्स:
- ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील
- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त केली चिंता
- विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना
- लसीकरण मोहीम तीव्र करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
ओमिक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, राज्य सरकारनं यावर चिंता व्यक्त केली आहे. जगभरात ओमिक्रॉनचा झपाट्याने प्रसार होत असल्याने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. लसीकरण वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. (उद्धव ठाकरे)
महाराष्ट्राने ओलांडला १२ कोटींहून अधिक डोसचा टप्पा
महाराष्ट्राने सध्या १२ कोटी ३ लाख १८ हजार २४० डोस दिले असून, ४ कोटी ३७ लाख ४६ हजार ५१२ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. ७ कोटी ६५ लाख ७१ हजार ७२८ लोकांनी एक डोस घेतला आहे. १८ ते ४४ वयोगटात ७६.६९ टक्के लोकांनी कमीत कमी १ डोस, तर ४५ पेक्षा अधिक वयोगटातील ८५.२५ टक्के लोकांनी एक डोस घेतलेला आहे.
मागील १२ तासांत जगात ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत ४५ टक्के वाढ
गेल्या १२ तासांत संपूर्ण जगात ओमिक्रॉनच्या रुग्णांत ४५ टक्के वाढ झाली आहे. ५४ देशांत याचा प्रसार झाला आहे. फ्रान्समध्ये दैनंदिन रुग्ण ४० हजारांच्या पुढे आढळत असून, जर्मनीत ही संख्या ५० हजारांच्या आसपास आहे. ऑस्ट्रियामध्ये देखील कोविड सुरू झाल्यापासून, सगळ्यात मोठी लाट आली असून दररोज ७ हजारांच्या आसपास नवीन रुग्ण आढळत आहेत.
अमेरिकेत देखील नोव्हेंबर २०२० सारखी परिस्थिती उद्भवली असून, दररोज एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. दक्षिण आफ्रिकेत गेल्या २ आठवड्यांत नवीन रुग्णात मोठी वाढ झाली असून दररोज दुपटीने रुग्ण आढळत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील काळजी घेण्याची गरज असून आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळले गेलेच पाहिजे, यावर भर देण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले.