हायलाइट्स:
- शिवसेनेच्या वचननाम्याच्या मनसेकडून निषेध
- ठाण्यात उद्या मनसेकडून निषेध मोर्चाचे आयोजन
- मनसे नेते अविनाश जाधव करणार मोर्चाचे नेतृत्व
- मनसे आमदार राजू पाटील उपस्थितांना करणार संबोधित
शिवसेनेकडून दरवेळी निवडणूक आली की, वचननामा काढला जातो. दर निवडणुकीला वचननामा काढला तर जातो ; परंतु दिलेल्या वचननाम्याची पूर्तता मात्र होत नाही. याचीच ठाणेकर नागरिकांना जाणीव करून देण्यासाठी, पालिकेतील सत्ताधाऱ्यांना याचा जाब विचारण्यासाठी, तसेच शिवसेनेचा निषेध करण्यासाठी उद्या, गुरुवारी मनसेकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. उद्या दुपारी दीड वाजता या मोर्चाची सुरुवात ठाण्यातील तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून होणार आहे. हा मोर्चा तलावपाळी येथून राम मारुती रोड, आराधना टॉकीज मार्गे ठाणे महानगरपालिका असा असणार आहे. ठाणे महानगरपालिकेजवळ या मोर्चाची सांगता होणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व मनसे नेते अविनाश जाधव हे करणार आहेत. या मोर्चानंतर ठाणे महानगर पालिकेच्या कचराळी तलाव येथे सभेचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या सभेला मनसेचे एकमेव आमदार राजू (प्रमोद) पाटील हे उपस्थित राहून कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
या मोर्चासाठी मनसेकडून पोलिसांची परवानगी घेण्यात आली आहे. करोना आणि ओमिक्रॉन संसर्ग पाहता पोलिसांनी या मोर्चासाठी फक्त ३०० लोकांची परवानगी दिली आहे. ठाणेकरांची होणारी फसवणूक त्यांना कळली पाहिजे, जे लोक फसवणूक करतात त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. त्यासाठी ठाणेकरांच्या दृष्टीने हा मोर्चा खूप महत्वाचा असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. त्यामुळे नियम आणि अटींचे पालन करून हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न असणार असल्याचे अविनाश जाधव म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांच्या लाडक्या लेकीचा रजिस्टर पद्धतीने विवाह सोहळा