हायलाइट्स:

  • कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक
  • निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न
  • भाजप काय निर्णय घेणार?

कोल्हापूर :काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक (विधानसभा पोटनिवडणूक) बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून जाधव यांच्या पत्नी जयश्री यांना उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप काय निर्णय घेणार यावरच निवडणुकीची लढत अवलंबून राहणार आहे.

कोल्हापूर उत्तरचे आमदार जाधव यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. जानेवारी महिन्यात या रिक्त जागेवर निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आतापासून हालचाली सुरू झाल्या आहेत. जाधव हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्याने ही जागा याच पक्षाला मिळणार हे नक्की आहे. पण काँग्रेसकडून उमेदवारी कुणाला मिळणार यावरच बरंच काही अवलंबून आहे. जाधव यांच्या शोकसभेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेकांनी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. काँग्रेसने तसा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादी आणि शिवसेनेला त्यांच्यासोबत राहावे लागेल. ही उमेदवारी भावनिक पातळीवर जाणार असल्याने भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे. कारण जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या. पती काँग्रेसचे आमदार झाल्यानंतरही त्या भाजपमध्येच राहिल्या. यामुळे भाजपकडून त्यांना फारसा विरोध होण्याची शक्यता वाटत नाही.

Breaking: संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन; देशावर मोठा आघात

जाधव यांनी उमेदवारी नाकारल्यास काँग्रेसकडून लढण्यासाठी सागर चव्हाण, सचिन चव्हाण यांच्यासह अनेकजण इच्छुक आहेत. माजी आमदार मालोजीराजे अथवा मधुरीमाराजे यांनी इच्छा व्यक्त केल्यास पक्ष त्यांचाही प्राध्यान्याने विचार करू शकतो. गेल्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मागितलेले दौलत देसाई हेदेखील दावा करू शकतात. येत्या पंधरा दिवसात याबाबत अधिक घडामोडी होऊ शकतात.

ठाण्यात शिवसेनेसमोर उभी ठाकणार मनसे; आक्रमक नेता करणार नेतृत्व

राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा जाधव यांनी पराभव केला होता. पण त्यांचे कॅबिनेट दर्जाचे पद कायम ठेवत शिवसेनेने त्यांचा मान कायम ठेवला. तेदेखील ही जागा शिवसेनेला मिळावी म्हणून प्रयत्न करू शकतात.

सध्या तरी ही जागा काँग्रेसला आणि उमेदवारी जाधव यांना असंच चित्र आहे. भाजपने अजूनही आपले पत्ते उघडलेले नाहीत. लढाई करून ताकद अजमावण्याची त्यांना संधी आहे. २०१४ ची निवडणूक वगळता शहरातून हा पक्ष एकदाही लढला नाही. प्रत्येकवेळी ही जागा शिवसेनेच्या वाट्यालाच गेली. यामुळे आता शहरात पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न भाजप करण्याची शक्यता आहे. येत्या १५ दिवसात भाजपकडून आपली भूमिका स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here