हायलाइट्स:

  • भारतीय हवाईदलाचे हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना
  • बिपीन रावत आणि अन्य १२ जणांनी गमावले प्राण
  • भारतीय लष्कराने व्यक्त केलं दु:ख

नवी दिल्ली :तामिळनाडू येथे भारतीय हवाईदलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत (हेलिकॉप्टर क्रॅश) भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत (सीडीएस जनरल बिपिन रावत) आणि अन्य १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनं संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत असताना भारतीय लष्करानेही दु:ख व्यक्त केलं आहे.

‘हवाई अपघातात संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत, त्यांच्या पत्नी आणि संरक्षण कर्मचाऱ्यांच्या पत्नींच्या कल्याणासाठी असलेल्या संघटनेच्या (डीडब्लूडब्लूए) अध्यक्षा मधुलिका रावत तसंच लष्कराचे इतर ११ कर्मचारी यांचा अकाली मृत्यू झाल्याबद्दल जनरल एम. एम. नरवणे आणि भारतीय लष्कराच्या सर्व श्रेणीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून अतीव दुःख व्यक्त करण्यात येत आहे,’ असं लष्कराने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

CDS बिपीन रावत यांच्या अपघाती निधनानं भारतासहीत पाकिस्तान लष्करही हळहळलं!

बिपीन रावत यांच्या कामगिरीवर भाष्य

भारतीय लष्कराने हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त करत असताना बिपीन रावत यांनी लष्करासाठी दिलेल्या योगदानाबाबत भाष्य केलं आहे. ‘भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी भारतीय लष्कराच्या उच्च संरक्षण संघटनांमध्ये अतिशय महत्त्वाच्या दूरगामी सुधारणांचा प्रारंभ केला. देशी बनावटीच्या लष्करी सामग्रीच्या उत्पादनाला चालना देण्यामध्ये आणि भारताच्या संयुक्त थिएटर कमांडचा पाया घालण्यामध्ये त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. त्यांनी दिलेला हा वारसा पुढे सुरू राहील आणि पुढील अनेक पिढ्या तो बळकट करतील,’ असं लष्कराने म्हटलं आहे.

Bipin Rawat Death Update: बिपीन रावत यांच्यासोबत ‘त्या’ हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होतं? नावं जाहीर

‘संरक्षण कर्मचाऱ्यांच्या पत्नींच्या कल्याणासाठी असलेल्या संघटनेच्या (डीडब्ल्यूडब्ल्यूए) माजी अध्यक्षा मधुलिका रावत यांची अनुपस्थितीही सर्वांनाच हेलावून टाकेल. तसंच सीडीएस आणि डीडब्ल्यूडब्ल्यूएच्या अध्यक्षांसोबत वेलिंग्टनला जात असलेल्या लष्कराच्या ११ कर्मचाऱ्यांची सर्वांनाच उणीव भासेल. त्यांनी सशस्त्र दलाच्या सर्वोत्तम परंपरांनुसार आपलं कर्तव्य बजावलं आहे,’ अशा शब्दांत भारतीय लष्कराने तामिळनाडूतील कुन्नूर येथे हवाईदलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here