नागपूर: राज्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर शहर पोलिसांनी कठोर उपाययोजना आखल्या आहेत. मध्यरात्री नागपुरातील उड्डाणपुलांवरुन सर्वाधिक वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येताच उड्डाणपुलांच्या दोन्ही बाजूने कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामुळे या मार्गावरील वर्दळ कमी झाली असली तरी रात्री ११.५३ वाजताच्या सुमारास दक्षिण नागपूरसह उपराजधानीतील सर्वच उड्डाणपुलांवर अचानक ‘ब्लॅक आऊट’ झाल्याने संभ्रम निर्माण झाला. नंदनवन परिसरासह सक्करदरा उड्डाणपुलावर झालेल्या या ‘ब्लॅक आऊट’मुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून दिवे बंद करण्यात आले की अन्य कारणाने, हे मात्र वृत्त लिहिपर्यंत कळू शकले नाही.

राज्यात संचार बंदी लागू झाल्यानंतर ‘मटा’ प्रतिनिधीने शहरात रात्री होणाऱ्या हालचाली टिपल्या असता हे तथ्य समोर आले. ‘मटा’ प्रतिनिधीने संचार बंदी लागू झाल्यानंतर शहरातील मध्यरात्री होणाऱ्या घडामोडी व पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेतला. सिव्हिल लाइन्स परिसरात रात्री १० वाजतानंतर बोटावर मोजण्याइतके नागरिक घराबाहेर फिरताना आढळले. यापैकी तीन नागरिकांकडे पाळीव श्वान होते. तर रात्री १०.१८ वाजताच्या सुमारास चिल्ड्रेन ट्राफिक पार्क मागील व्हीआयपी मार्गावर पाच युवक तीन मोपेडवर जाताना आढळले. यापैकी तीन युवकांची देहयष्टी अत्यंत संशयास्पद होती. नाकाबंदीदरम्यान या ठिकाणी नेहमी पोलिस तैनात असतात,परंतु सोमवारी रात्री येथे एकही पोलिस आढळून आला नाही.

जमावबंदी व त्यानंतर सोमवारी लागू झालेल्या संचारबंदीनंतर पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सह पोलिस आयुक्त रवींद्र कदम यांनी अत्यंत सावधगिरी बाळगत काळजीपूर्वक पावले उचलली आहेत. खरबदाराची उपाय म्हणून शहरात येणाऱ्या आठ नाक्यांवर पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. नागपुरातून बाहेर जाणाऱ्या व उपराजधानीत येणाऱ्या प्रत्येकावर ‘करोना बंदी’ करण्यात आली आहे. कोण कुठे कशासाठी जात आहे, गेला होता याबाबत पोलिस कसून चौकशी करीत आहेत.

नाक्यांशिवाय शहरातील उड्डाणपुलांजवळही पोलिस तैनात करण्यात आले आहेत. उपराजधानातील सर्वच उड्डाणपुलांवर प्रवेश घेताना अथवा खाली उतरताना पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. यासह महत्त्वाच्या चौकांमध्ये पोलिस कर्तव्य बजावत आहेत. सोमवारी रात्री ११.५३ वाजताच्या सुमारास
मटा प्रतिनिधी सक्करदरा उड्डाणपुलांवर असताना अचानक पुलावरील दिवे बंद झाले. नेमके काय झाले हे प्रतिनिधीसह अन्य वाहनचालकाही कळेनासे झाले. वाहनचाकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. वाहनाचा दिवा ‘अप्पर डिप्पर’ करीत चालक समोर निघाले असता पोलिसांचा ताफाच आडवा झाला. प्रतिनिधीकडे ओळखपत्र होते. त्याने पोलिसांना ते दाखविले. पोलिसांनीही ओळखपत्र बघताच प्रतिनिधीला समोर जाण्याचा इशारा केला. पण ज्यांच्याकडे ओळखपत्र नव्हते ते रात्री कशासाठी फिरत आहेत, याचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न नागपूर पोलिस करताना आढळून आले.

आपकी खातीर

नागपूरकर पोलिसांना सहकार्य करतात पण सोमवारी मात्र नागपूरकर पोलिसांना प्रतिसाद देताना आढळून आले नाहीत. करोना बंदी झुगारत नागपूरकर खुलेआम रस्त्यांवर फिरताना आढळले. शहरवासीय कोणतीही काळजी न करता झोपेत असताना शहर पोलिस मात्र सोमवारी रात्री प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत होते. त्यांच्या शिस्तीचा भाग असला तरी पोलिस मात्र प्रत्येक नागपूरकरांच्या आरोग्यासाठी झटत आहे. ही खटपट त्यांच्या वागणुकीतून जाणवते. ते दिवस-रात्र जागून केवळ ‘आपके खातीर’ रस्त्यांवर उभे आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here