हायलाइट्स:
- कल्याणच्या रेल्वे पार्किंगमधून दुचाकी चोरीला
- दुचाकीचालकाच्या तक्रारीवरून पार्किंग चालकाविरोधात गुन्हा
- रेल्वे पोलिसांनी पार्किंग चालकाला केली अटक
- रजिस्टरमध्ये खाडाखोड केल्याचा दुचाकी मालकाचा आरोप
कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी परिसरात राहणाऱ्या अप्पू दत्ता यांनी, ७० हजार रुपये किंमतीची दुचाकी बुधवारी रेल्वेच्या अधिकृत पार्किंगमध्ये पार्क केली होती. त्यासाठी २० रुपयांची पावतीही त्यांनी घेतली होती. दुचाकी सुरक्षित राहावी या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी ती पार्क केली होती. मात्र, रात्री कामावरून परतल्यानंतर ते नेहमीप्रमाणे आपली दुचाकी घेण्यासाठी पोहोचले. त्यावेळी त्यांना तिथे दुचाकी दिसून आली नाही. यामुळे त्यांना धक्काच बसला. त्यांनी पार्किंगमध्ये असलेल्या महेश शिंदे याच्याकडे चौकशी केली असता, त्याने टेबलवर असलेल्या रजिस्टरमधील दुचाकीच्या क्रमांकावर खाडाखोड केल्याचे दिसून आले. याचा जाब विचारताच त्याने रजिस्टरचे खाडाखोड केलेले पानच फाडून टाकले. दत्ता यांनी आपली दुचाकी महेश शिंदे यानेच गायब केल्याचा आरोप करत या प्रकरणी रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. रेल्वे पोलिसांनी फसवणुकीसह पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महेश शिंदे विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
याबाबत कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दूल यांनी सांगितले की, एखादी दुचाकी चोरीला गेली, गायब झाली तर त्याबाबत दुचाकी मालकाची तक्रार योग्य आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पार्किग चालक महेश शिंदे याला अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पार्किंगमध्ये सीसीटीव्ही नाही. तसेच आगीची घटना घडली तर, सुरक्षिततेची व्यवस्था नाही. पार्किग अनधिकृत आहे की, अधिकृत आहे याचाही तपास केला जाईल. दुचाकीचा शोध घेण्यात येत आहे.