शहराची जीवनवाहिनी असलेल्या पंचगंगा नदी परिसरात गवा आला असून त्याने जामदार क्लबसमोरील राबाड्याच्या गवताळ माळातील झाडाझुडपात ठाण मांडले आहे. गवा नागरी वस्तीत येऊ नये म्हणून काळजी घेतली जात असून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात पाठवण्यासाठी वन विभाग, पोलिस, अग्निशमन दल, आपत्ती निवारण विभाग आणि वन्यजीव प्रेमी संघटना एकत्रित प्रयत्न करत आहेत.
गुरुवारी रात्री शिंगणापूर परिसरात गवा शहरातील उपनगर लक्षतीर्थ वसाहतीत आला. त्याच्या मागे कुत्री लागली. गवा महाकाय असल्याने त्याला हुसकावण्यासाठी मध्यरात्रीपासून प्रयत्न सुरू झाले. पण रात्री अंधार असल्याने मर्यादा आल्या. आज शुक्रवारी पहाटे गवा थेट तोरस्कर चौकातील शाहू गल्लीजवळ आला. त्यावेळी रस्त्यांवर वर्दळ नव्हती. एका चहावाल्याने गवा आला म्हणून आरोळी ठोकल्यावर तो पंचगंगा नदीकडे गेला.
वाचा:
गवा आल्याचं समजताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी नदीकडे धाव घेतली. त्यानंतर गवा समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारातून थेट राबाडेंच्या गवताळ रानात आला. रानातील महादेव मंदिराच्या पिछाडीस दमलेला गवा थांबला. ही घटना कळताच अग्निशमन दल, वन खात्याचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी पोचले. पोलिसांनी गायकवाड पुतळा ते आखरी रास्ता मंडळ हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. काही अतिउत्साही नागरिकांनी जवळ जाऊन गव्याचे फोटो काढण्याचे प्रयत्न केल्यावर पोलिसांनी त्यांना चांगलाच प्रसाद दिला. गवा नागरी वस्तीत येऊ नये यासाठी मिरच्याची धुरी, राबाडे मळ्याच्या कडेने दोर बांधले आहेत. ऊन वाढू लागले तसे गवा मंदिराच्या मागे बसला होता.
वाचा: