हायलाइट्स:

  • या रुग्णाने कोरोना लसही घेतलेली नाही
  • ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी टांझानियाहून भारतामध्ये परतली होती
  • या व्यक्तीला सध्या अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

मुंबई : कोरोनाचाया Omycron व्हेरिएंटचा राज्यात फारसा प्रादुर्भाव झाला नसला तरी या विषाणूमुळे प्रत्येकाच्या मनात कुठे ना कुठे धास्ती जरुर आहे. अशातच आता मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट अशी ख्याती असलेल्या धारावी परिसरात ओमायक्रॉनचा रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णाने कोरोना लसही घेतलेली नाही. ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी टांझानियाहून भारतामध्ये परतली होती. त्यानंतर आता या व्यक्तीला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यक्तीला सध्या अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीला कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत, मात्र त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीच्या संपर्कात दोघेजण आले होते. त्यांचाही माग काढण्यात यश आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

यापूर्वी कोरोनाच्या दोन्ही लाटांवेळी धारावी परिसरात मोठ्याप्रमाणावर रुग्ण आढळून आले होते. हा परिसर प्रचंड दाटीवाटीचा असल्याने कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे महानगरपालिका नेहमीच याठिकाणी विशेष काळजी घेताना दिसून येते. आतादेखील धारावीत ओमायक्रॉनचा रुग्ण सापडल्यानंतर पालिका काय उपाययोजना करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून स्थानिक नागरिकांना काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धारावीत आज सापडलेल्या रुग्णामुळे आता महाराष्ट्रात सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या ११ वर गेली आहे. तर गुजरातमध्ये ओमायक्रॉनचे ३ रुग्ण आहेत.
COVID-19 vaccination: लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांवर निर्बंध लागू होण्याची शक्यता
दरम्यान, राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. सध्या पालिकेकडून कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी पालिकेकडून तब्बल 20 लाख अँटिजेन टेस्ट किटची खरेदी केली जाणार आहे. यासाठी निविदा काढण्यात आल्या असून त्यासाठी अनेक कंत्राटदारांनी त्यासाठी उत्सुकता दर्शविली आहे. कंत्राटदारांमधील या स्पर्धेमुळे पालिकेला अँटिजेन टेस्ट किट अवघ्या नऊ रुपयांमध्ये मिळू शकते. तसेच टेस्टनंतर फक्त अर्ध्या तासात अहवाल देण्याची योजनाही पालिकेने आखली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांना ओळखून त्यांना इतरांपासून तातडीने विलग करणे शक्य होईल.

सुरुवातीच्या टप्प्यात पाच लाख किट खरेदी केली जातील. ही अँटीजेन किट खरेदी केल्यानंतर पालिकेकडून रेल्वे स्टेशन, मॉल, बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणे, बस स्थानके अशा ठिकाणी वेगाने चाचण्या केल्या जातील. पालिकेच्या चाचणी केंद्रात अँटीजन चाचणी विनामूल्य केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here