हायलाइट्स:
- आमदार विनय कोरे यांनी दिली १५ वर्षांपूर्वी दिलेल्या चुकीची कबुली
- ईर्षा आणि भावनेच्या राजकारणातून माझ्याकडून मोठी चुक झाली – कोरे
- महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला लाखो रुपये दिल्याची कबुली
पंधरा वर्षापूर्वी आमदार कोरे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिकेतील माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले. नगरसेवकांना आपल्याकडे खेचून महाडिकांची महापालिकेतील सत्ता संपुष्टात आणली होती. या कालावधीतील चुकीच्या घडामोडीविषयी कोरे यांनी पहिल्यांदाची जाहीरपणे चूक मान्य केली. वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा रविवारी झाली. या प्रसंगी कोरे यांनी ही कबुली दिली. विशेष म्हणजे, यावेळी व्यासपीठावर महादेवराव महाडिक होते.
वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार कोरे, आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार महादेवराव महाडिक, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी आणि भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची आघाडी झाली आहे. सर्वसामान्य लोकांच्या मनात राजकारणाविषयीचा आदर कमी होईल, तिरस्कार वाढेल असे राजकारण बंद झाले पाहिजे अशी आपली भूमिका आहे. समन्वयाचं, विचाराच राजकारण आपणाला सुरु करता येईल का हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मी प्रयत्न केला. परमेश्वरी कृपेने ते यशस्वी झालं. माणसांच्या हातून घडणारा हा काही विषय नव्हता. ’
महापालिकेतील त्या राजकारणाविषयी बोलताना कोरे म्हणाले, ‘मंत्री हसन मुश्रीफ आणि मी त्यावेळी महापालिकेच्या राजकारणात एकत्र होतो. माजी आमदार महादेवराव महाडिक आणि मंत्री सतेज पाटील हे एकत्र होते. मी, तेव्हा जनसुराज्य शक्ती पक्षाचा महापौर केला. त्या कालावधीत भावनेच्या भरात काही गोष्टी घडल्या. पक्षाचा महापौर करण्यासाठीएका एका नगरसेवकाला ३५-३५ लाख रुपये दिले. जनसुराज्य शक्ती पक्षाचा महापौर झाला, मलाही बरं वाटलं. पण या राजकीय घडामोडीचा परिणाम म्हणजे माझ्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. भावनेच्या भरात माझ्या हातून घडलेली चूक मी मान्य करतो.’