हायलाइट्स:
- भाजपचा प्रचार करतो म्हणून पदाधिकाऱ्यावर हल्ला
- कल्याण ग्रामीणमधील भाल गावातील घटना
- कारच्या काचेवर मोठा दगड घालून केली तोडफोड
- भाजप पदाधिकाऱ्याला मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
कल्याण ग्रामीणमधील भाल गावात भाजप पदाधिकारी अमित चिकणकर राहतात. याच परिसरात त्यांचे कार्यालय आहे. ग्रामीण भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अमित यांनी परिसरात भाजपचे काम वेगात सुरू केल्याने काही दिवसांपासून काही तरुण त्यांच्याशी वाद घालत होते. दरम्यान काल अमित हे कार्यालयाबाहेर उभे असताना सायंकाळी ते तरूण त्यांच्याजवळ आले आणि अमित यांच्याशी वाद घातला. मात्र ग्रामस्थांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. त्यामुळे अमितदेखील तेथून निघून गेले. अमित आपल्या कारने घरी जात असताना, अचानक तिघे जण तिथे आले. त्यांनी कार अडवली आणि मोठा दगड कारच्या पुढच्या काचेवर घातला. अमित यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र अमित त्यांच्या तावडीतून ते निसटले. त्यांनी कार तिथेच टाकून ज्या ठिकाणी ग्रामस्थांची गर्दी होती तिथे गेले. त्यानंतर ते तिघेही जण तेथून पळून गेले. यातील दोघांना त्यांनी ओळखले असून, त्यांची नावेही त्यांनी सांगितली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी देखील घटनेचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.