हायलाइट्स:
- रत्नागिरी जिल्ह्यात एसटीचे एकूण ३७७९ कर्मचारी आहेत
- सोमवारी सकाळपर्यंत यापैकी जवळपास 600 कर्मचारीच कामावर हजर झाले आहेत
- कर्मचारीच नसल्यामुळे रत्नागिरीतील मुख्य डेपो पूर्णपणे बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर ओढावली आहे
रत्नागिरी जिल्ह्यात एसटीचे एकूण ३७७९ कर्मचारी आहेत. सोमवारी सकाळपर्यंत यापैकी जवळपास 600 कर्मचारीच कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक प्रमुख एसटी डेपोवरुन मर्यादित बसेस सोडल्या जात आहेत. यामध्ये दापोली, देवरुख, राजापूर या एसटी डेपोचा समावेश आहे. तर कर्मचारीच नसल्यामुळे रत्नागिरीतील मुख्य डेपो पूर्णपणे बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर ओढावली आहे. उर्वरित डेपोंमधून फक्त 30 टक्के क्षमतेने वाहतूक सुरु आहे. त्यामुळे एसटी प्रशासनासमोरील पेच अद्याप कायम आहे. त्यामुळे आता परिवहन मंत्रालयाकडून संबंधित कर्मचाऱ्यांना मेस्मा लावला जाणार का, हे पाहावे लागेल.
दरम्यान, आतापर्यंत एसटी महामंडळाला रविवारी 122 आगारातील वाहतूक अंशत: सुरु करण्यात यश आले आहे. रविवारी सायंकाळच्या आकडेवारीनुसार रविवारी 2119 बसेस धावल्याची माहिती आहे.
गेल्या महिनाभरापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. राज्य सरकारने वेतनवाढ लागू करुनही अनेक कर्मचारी अद्याप कामावर परतलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषद घेऊन निर्वाणीचा इशारा दिला होता. आंदोलक कर्मचाऱ्यांनी येत्या सोमवारपर्यंत कामावर रुजू व्हावे. सोमवारी कामावर रुजू झाल्यास या कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई मागे घेतली जाईल. मात्र, या मुदतीत कामावर रुजू न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यातंर्गत कठोर कारवाई केली जाईल, असे परब यांनी सांगितले होते. संपामुळे आतापर्यंत एसटीचे तब्बल 550 कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता यापुढे कोणाचीही हयगय केली जाणार नाही. तसेच एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याचा निर्णय तात्काळ घेतला जाऊ शकत नाही. न्यायालयीन समितीच्या अहवालानंतरच याबाबत निर्णय होऊ शकतो, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले होते.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times