हायलाइट्स:
- रायगड किल्ल्यावर चढताना पर्यटकाचा मृत्यू
- पनवेलहून रायगडावर फिरायला गेला होता पर्यटक
- महाड तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद
रायगडमधील आजूबाजूची गावं, तसेच महाराष्ट्रातून रायगड किल्ल्यावर मोठ्या संख्येने पर्यटक जात असतात. शनिवारीही अनेक पर्यटक रायगड किल्ल्यावर गेले होते. पनवेल येथील ५१ वर्षीय पर्यटकही पायरी मार्गाने रायगड किल्ल्यावर निघाला होता. त्याचवेळी चक्कर येऊन खाली कोसळल्यानंतर पर्यटकाचा मृत्यू झाला. मृत पर्यटक पनवेल येथील असून, निळकंठ विराधवन असे त्यांचे नाव आहे.
पनवेल येथून निळकंठ विराधवन हे रायगड किल्ल्यावर जात होते. पायरी मार्गाने जात असताना, महादरवाजाजवळ त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची त्यांचे सहकारी शशीभूषण शुक्ला यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्याआधारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निळकंठ यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.