मुंबई : मुकेश अंबानी यांच्या उद्योग समुहाने व्हायरसवर मात करण्यासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. रिलायन्सने दोन आठवड्यांच्या अत्यंत कमी कालावधीत १०० बेडची क्षमता असलेलं देशातील पहिलं करोना समर्पित रुग्णालय उभारलं आहे, तर क्वारेंटाईन फॅसिलिटी, चाचणीच्या किट आणि प्रति दिन १० लाख मास्कची निर्मिती रिलायन्सकडून केली जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या मदतीने सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनने मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात १०० बेडची क्षमता असलेलं केंद्र सुरू केलं आहे. करोनाबाधित रुग्णांवर इथे उपचार केले जातील.

देशातील हे करोना समर्पित पहिलं केंद्र असून यासाठीचा सर्व खर्च रिलायन्सकडून केला जाणार आहे. या केंद्रावर निगेटिव्ह प्रेशर रुम तयार करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे करोनाचा संसर्ग होणार नाही आणि बाधितांची संख्या रोखण्यास मदत होईल. कंपनीनेच पत्रकाद्वारे याची माहिती दिली. सर्व बेड हे आवश्यक साहित्यांसह उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटर्स, पेसमेकर्स, डायलॅसिस मशिन आणि पेशंट मॉनिटरिंग साहित्यही उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.

परदेशातून आलेल्या व्यक्तींना कॉरेंटाईनमध्ये ठेवलं जात आहे. यासाठी सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनने विशेष वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याचीही तयारी दाखवली आहे. यामुळे विलगीकरणासाठी आवश्यक असलेल्या सुविधा तातडीने मिळतील आणि रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातील, असं रिलायन्सकडून सांगण्यात आलं आहे.

रिलायन्स लाईफ सायन्सकडून करोनाची चाचणीसाठी आवश्यक किट्स आणि साहित्य आयात केली जात आहेत. रिलायन्सचे डॉक्टर आणि संशोधक ओव्हर टाइम करुन या जीवघेण्या व्हायरसविरोधात लढा देत आहेत, अशी माहिती कंपनीने दिली.

मास्क निर्मितीची क्षमताही वाढवणार
रिलायन्स प्रति दिन १० लाख मास्क निर्मिती करण्याची तयारी करत आहे. यासोबतच खाजगी सुरक्षा साहित्य निर्मिती करण्यावरही भर दिला जात आहे. करोना व्हायरसविरोधात दोन हात करत असलेल्या डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक कपडेही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

रिलायन्स उद्योग समुहाने राज्यातील लोधिवलीमध्ये विशेष विलगीकरण सुविधा उपलब्ध केली असून याचा ताबा जिल्हा प्रशासनाला दिला आहे. कंपनीचे सर्व रिटेल दुकाने चालू राहतील आणि आपत्कालीन सुविधांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना आपल्या इंधन केंद्रांवरुन मोफत इंधन पुरवलं जाईल, असंही रिलायन्सने सांगितलं आहे.

रिलायन्सने बहुतांश कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करत असलेले कर्मचारीच कामाच्या ठिकाणी जाऊन काम करत आहेत. या सर्वांव्यतिरिक्त रिलायन्सने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ५ कोटी रुपयांची मदत केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here