जगभरात धुमाकूळ घालणारं करोना विषाणूचं नवं स्वरुप ‘ओमिक्रॉन‘चा रुग्णांच्या जीविताला फारसा धोका नसल्याचं आतापर्यंत सांगितलं जात असलं तरी ‘ओमिक्रॉन’च्या जगातील पहिल्या बळीची नोंद झालीय. ब्रिटनमध्ये ‘ओमिक्रॉन’मुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय.
ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ओमिक्रॉनमुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची पुष्टी केलीय. करोनाचा हा नवा स्ट्रेन मोठ्या संख्येत लोकांना रुग्णालयात पोहचवण्याचं काम करतोय, त्यामुळे आरोग्य प्रशासनावर ताण वाढत असल्याचंही बोरिस जॉन्सन यांनी नमूद केलंय.
३० हून अधिक वयाच्या नागरिकांनी करोना लशीचा ‘बुस्टर डोस’ अवश्य घ्यावा, असं आवाहनही ब्रिटिश पंतप्रधानांनी केलंय. ओमिक्रॉनच्या धोक्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा इशाराही त्यांनी नागरिकांना दिलाय.
ओमीक्रोनमुळे संक्रमण दर वाढला
पश्चिम लंडनच्या पॅडिंग्टन इथल्या लसीकरण क्लिनिकच्या भेटीदरम्यान बोलताना पंतप्रधान जॉन्सन यांनी हे वक्तव्य केलंय. ‘ओमिक्रॉन’मुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणं ही चिंतेची बाब असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
ब्रिटनमध्ये ‘बुस्टर डोस’ देण्याचं काम सुरू
ब्रिटनमध्ये ३० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना कोविड लसीचा ‘बुस्टर डोस’ देण्याची मोहीम सोमवारपासून सुरू करण्यात आलीय. ब्रिटनच्या आरोग्य अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात वेगानं फैलावणाऱ्या करोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. इंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेनं (NHS) दिलेल्या माहितीनुसार, देशात ३० ते ३९ वयोगटातील ७५ लाख नागरिक आहेत, त्यापैंकी ३५ लाख जण ‘बुस्टर डोस’ घेण्यासाठी पात्र ठरलेत.