औरंगाबाद बातम्या लाईव्ह: एका जिल्ह्याने राज्याची चिंता वाढवली, विदेशातून आलेले ‘ते’ ३८ प्रवासी बेपत्ताच – aurangabad news the 38 migrants from abroad are missing
औरंगाबाद : दुसरी लाट ओसरत असतानाच आता ओमिक्रॉन या करोनाच्या नवीन विषाणूमुळे जगभराची चिंता वाढली. त्यातच औरंगाबादमध्ये विदेशातून आलेल्या ३८ प्रवासी सापडत नसून अजूनही बेपत्ता असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. विदेशातून येणाऱ्या लोकांमध्ये ओमिक्रॉनचे विषाणू आढळून आल्याने विदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची करोना चाचणी केली जात आहे. तसेच त्यांच्यावर लक्ष सुद्धा ठेवलं जातं आहे.
मात्र, औरंगाबादमध्ये १ ते १३ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात एकूण ५८४ प्रवासी आलेत, मात्र यातील ३८ जणांचा अजूनही शोध लागलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, १ ते १३ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात एकूण ५८४ प्रवासी आलेत. ज्यात १०० जण पर्यटक आहेत, तर ४८४ हे नागरिक आहे. तर यातील ३८ जण अजूनही बेपत्ता असून,३० जण बाहेरगावी आहेत. तर इतरांचा पत्ता लागत नाही. विशेष म्हणजे यातील ३५ जणांशी महापालिका नियंत्रण कक्षाने संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
ओमिक्रॉन हा विषाणू विदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांमध्ये आढळून येत असल्याचं स्पष्ट झाला आहे. त्यामुळे विदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी करणं महत्त्वाचं आहे. त्यानुसार प्रशासन खबरदारीसुद्धा घेत आहे. असे असताना औरंगाबादमध्ये आलेल्या ३८ प्रवाशांशी संपर्क होत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.