हायलाइट्स:
- मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर रुपाली पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे
- मनसेच्या पुण्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणून रुपाली पाटील यांची ओळख होती
- महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या जाण्याने मनसेला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे
रुपाली ठोंबरे-पाटील यांनी मंगळवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे आपला राजीनामा पाठवला होता. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील मी माझ्या सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. पण जरी मी राजीनामा देत असले तरी तुम्ही माझ्या कायम हृदयात रहाल. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देतं. यापुढेही आपले आशीर्वाद रहावेत, असे रुपाली पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.
मनसेच्या पुण्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणून रुपाली पाटील यांची ओळख होती. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या जाण्याने मनसेला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे बुधवारपासून पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते रुपाली ठोंबरे-पाटील यांच्या राजीनाम्याविषयी काही प्रतिक्रिया व्यक्त करणार का, हे पाहावे लागेल.
मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर रुपाली पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी त्या राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या हातावर बांधणार असल्याचे समजते. गेल्या अनेक दिवसांपासून त्या पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. त्या पक्षात नाराज होत्या. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. पक्षातील काही रिकामटेकडे लोक आपल्याविषयी नको ती चर्चा करतात, अशी तक्रार त्यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती.