‘करोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारनं राज्यात संचारबंदी लागू केली आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात साथीचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यानंतरही अनेक ठिकाणी लोक गर्दी करताना दिसत आहेत. आजारा टाळण्यासाठी पाळाव्या लागणाऱ्या नियमांचं पालन होताना दिसत नाहीए. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुन्हा एकदा जनतेला सरकारच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
‘पुण्यात सुरुवातीला जे जोडपं करोनाबाधित आढळलं होतं. त्यांचा आज दुपारी दुसरा अहवाल येणार आहे. त्यांच्याबातीत दिलासा देणारी बातमी येईल अशी अपेक्षा आहे. मात्र, तरीही कुणीही गाफील राहता कामा नये. भाजीपाला मार्केटमध्ये आजही गर्दी होताना दिसतेय. भाजीपाल्याचा पुरवठा सुरूच आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. गर्दी करू नका,’ अशी विनंती त्यांनी केली.
वाचा:
‘हे तर मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारे’
करोनाच्या साथीचा आणि त्यामुळं निर्माण झालेल्या भीतीचा फायदा घेऊन काही गोष्टींची साठेबाजी केल्याच्या बातम्या येत आहेत. त्याबाबत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. ‘मास्कची साठेबाजी करणाऱ्यांच्या विरोधात अशी कायदेशीर कारवाई केली जाईल की त्यांना त्यांच्या दोन पिढ्या आठवतील. यांना मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारेच म्हणायला हवं, असं ते म्हणाले. सरकारच्या सूचना लोकांनी गांभीर्यानं घेतल्या नाहीत तर अधिक कठोर पाऊल उचलावं लागेल, असंही ते म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times