सात दिवसांचे विलगीकरण

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरः नागपुरात आढळलेल्या पहिल्या ओमायक्रॉनबाधिताची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली. त्यामुळे बुधवारी दुपारी त्याला सुटी देण्यात आली.

अविनाश पत्रे (वय ४०), असे या रुग्णाचे नाव आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत असली तरी नियमानुसार त्यांना पुढील सात दिवस गृहविलगीकरणात राहावे लागणार आहे. मुंबई, पुण्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर ५ डिसेंबर रोजी नागपुरातही या व्हेरिएंटचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. पत्रे हे पश्चिम आफ्रिकेतील बुर्किनो फासो येथून दिल्ली व तेथून विमानाने नागपुरात आले होते. नागपूर विमानतळावर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. चाचणीनंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आले होते. मात्र, अहवाल पॉझिटिव्ह येताच त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले.

सुरुवातीपासूनच त्यांना कोणतीही लक्षणे नव्हती. ५ डिसेंबर रोजी नागपुरात विमानतळावर ज्या प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या, त्यात तिघे जण पॉझिटिव्ह आढळले होते. दरम्यान, या तिघांचेही नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठवण्यात आले होते. यात पत्रे यांचा अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला. पत्रे यांची १४ डिसेंबर रोजी म्हणजे मंगळवारी आटरीटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात ते निगेटिव्ह आढळले. त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांचीही यापूर्वीच आरटीपीसाआर चाचणी झाली. त्यात ते सर्वच निगेटिव्ह आले होते. बुधवारी पु्हा एकदा पत्रे यांची चाचणी झाली. त्याचाही अहवाल निगेटिव्ह आला. त्यांच्यासहच प्रवासात असलेले आणखी दोनजण करोना पॉझिटिव्ह होते. त्यांच्यावरही एम्समध्येच उपचार सुरू होते. मात्र, त्यांचाही अहवाल निगेटिव्ह असल्याने त्यांनाही आता सुटी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here