म. टा. प्रतिनिधी, मुंबई: एसटी संपात सहभागी झालेले कर्मचारी हिंसक होत असून अनेक ठिकाणी गाड्या फोडण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे महामंडळाने कठोर कारवाई करत ११ एसटी कर्मचाऱ्यांना तातडीने बडतर्फ केले आहे. महामंडळात रोजंदारी पद्धतीने काम करणाऱ्या एकूण २,०४३ कर्मचाऱ्यांवर संपात सहभागी झाल्याचा ठपका ठेवत सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
बुधवारी ५२ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली असून संपात सहभागी झालेल्या १११ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दोन रोजंदारांची सेवासमाप्ती करण्यात आली. सध्या एसटी संपात ६७,६७५ कर्मचारी सहभागी असल्याने १२८ आगार पूर्ण बंद, तर १२२ आगारांतील वाहतूक अंशत: सुरू आहे.