महाराष्ट्रात आढळून आलेल्या आठ रुग्णांपैकी एक रुग्ण वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील असल्याचे मंगळवारी समोर आले. नालासोपारा पश्चिमेकडे असलेल्या या रुग्णाची करोना चाचणी ३ डिसेंबर रोजी मुंबई येथे करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर ओमिक्रॉन चाचणी केली असता त्याचा अहवालही पॉझिटिव्ह असल्याचे मंगळवारी समोर आले. त्यावेळी हा रुग्ण घरीच उपचार घेत होता. त्यानंतर त्याला विरार येथील पालिकेच्या जीवदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या कुटुंबातील दोघांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. बुधवारी पुन्हा बाधित रुग्णाची चाचणी करण्यात आली. यामध्ये या रुग्णासह त्याच्या कुटुंबातील दोघांचा अहवाल निगेटिव्ह आला. या रुग्णाला उपचारानंतर घरी पाठविल्याचे श्री जीवदानीदेवी रुग्णालयाचे नियंत्रण अधिकारी डॉ. मरिना फिलिप्स यांनी सांगितले. तरीही त्याच्यावर आरोग्य विभाग नजर ठेवणार असून घरीच विलगीकरणात राहण्यास सांगितले आहे.
दुसरीकडे पालिका हद्दीत मंगळवारी ओमिक्रॉन रुग्ण आढळून आल्यानंतर चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी पालिकेने विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली. नागरिकांनी नियम पाळून जबाबदारीने वागावे, असे आवाहन पालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी केले.
लसीकरणास प्रतिसाद
वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील लसीकरणाची पहिली मात्रा घेतलेल्यांची संख्या ९३ टक्क्यांवर पोहोचली आहे. मागील महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात लसीकरणाकडे पाठ फिरविलेल्या ६ हजार नागरिकांचा समावेश होता. पालिकेने त्यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पालिकेच्या या प्रयत्नाला यश आले. त्यातील अनेकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. ओमिक्रॉनच्या भीतीने लसीकरण करण्यात येत असल्याचे डॉ. भक्ती यांनी सांगितले.