हायलाइट्स:
- शहरातील संतापजनक घटना समोर
- पतीनेच पत्नीवर विविध लोकांकडून करून घेतला अत्याचार
- पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात एक जोडपे वास्तव्यास आहे. या दोघांचा २०१६ मध्ये विवाह झाला होता. वर्षभरानंतर संबंधित पती लैंगिकदृष्ट्या कमकुवत असल्याची बाब समोर आली. त्यानंतर त्याने विविध लोकांना आपल्या पत्नीच्या फोनवरून मेसेज पाठवत त्यांच्याकरवी पत्नीवर अत्याचार करून घेतले. तब्बल तीन वर्षे हा प्रकार सुरू होता. या दरम्यान, संबंधित पीडिता आपल्या पतीला सोडून माहेरी गेली. तिने घडलेल्या प्रकाराची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर महिलेच्या कुटुंबियांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार बारामती शहर पोलिसांनी संबंधित पीडितेच्या पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकारानंतर पतीसह पाच जणांना अटक करून बारामतीतील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर बारामती आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पतीनेच आपल्या भावना उत्तेजित करण्यासाठी पत्नीवर इतरांकरवी अत्याचार घडवल्याच्या या घटनेमुळे संतापाची भावना व्यक्त होत आहे.