हायलाइट्स:
- डोंंबिवलीत रिक्षाचालकाला टोळीकडून बेदम मारहाण
- दुचाकीला कट मारल्याच्या रागातून केली मारहाण
- मारहाण करताना आरोपींकडे होते पिस्तूल
- डोंबिवली पोलिसांनी दोघांना केली अटक
डोंबिवली पूर्व येथून रिक्षाचालक राजेश भालेराव रिक्षा घेऊन जात रस्त्यावरून असताना कट मारण्याच्या कारणावरून दुचाकीस्वार सिद्धार्थ मोरे यांच्यात वाद झाला होता. सिद्धार्थ मोरे याने अमोल केदारे व त्यांच्या साथीदारांसह भालेराव याला इंदिरा चौकात गाठले. अमोल व सिद्धार्थ यांनी आपल्या १० ते १५ साथीदारांसह भालेराव याला बेदम मारहाण केली. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती.
भालेराव याने डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, या ठिकाणी त्यांना पिस्तुलाची गोळी आढळून आली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या प्रकरणी अमोल केदारे व सिद्धार्थ मोरे यांना ताब्यात घेतले. अमोलला पोलिसांनी खाक्या दाखवताच, त्याने भांडणादरम्यान आपल्याजवळील पिस्तुल काढत असताना, आपल्याजवळील पिस्तूलमधून गोळी पडल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अमोल केदारे व सिद्धार्थ मोरे या दोघांना अटक केली. अमोलने हे पिस्तूल कुठून आणले व कशासाठी, याचा तपास पोलीस करत आहेत.
डोंबिवलीचे एसीपी जे. डी. मोरे यांनी सांगितले की, डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी भालेराव याला आरोपी सिद्धार्थ आणि अमोल या दोघांनी दुचाकीला कट मारल्याच्या रागातून मारहाण केली होती. त्यांच्याकडे पिस्तुलही होते. त्यातील एक गोळी घटनास्थळी पडली होती. या गुन्ह्याचा तपास करून, पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडील पिस्तुल हस्तगत केले आहे. फिर्यादी आणि आरोपी यांच्यात वाद होता, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.