करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू करण्यास सुरुवात केली. मात्र या सर्वांत दहावी परीक्षा मात्र सुरूच ठेवली होती. अखेर परिस्थिती हाताबाहेर जाते हे लक्षात आल्यावर २३ मार्च रोजी होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला. मात्र तोपर्यंत दक्षिण मुंबईतील एका नामांकित शाळेत दहावीची परीक्षा देणारा एक विद्यार्थी करोना चाचणीत ‘पॉझिटीव्ह’ असल्याचे निदान झाले आहे. त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या विद्यार्थ्याने ज्या केंद्रात परीक्षा दिली तेथे ३५३ विद्यार्थी परीक्षा देत होते. एका वर्गात २५ विद्यार्थ्यांची व्यवस्था होती. या विद्यार्थ्याची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर पालिका आरोग्य विभागाने शिक्षण विभागाकडून संबंधित विद्यार्थ्यांच्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांची यादी मागावली आहे. विभागाच्या माहितनुसार आता पुढील कार्यवाही सुरू आहे.
संबंधित विद्यार्थ्याच्या वडिलांना आणि बहिणीला करोनाची लागण झाली होती, अशी माहिती मिळाली आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थी व शिक्षक असे मिळून किमान ३६ जण या विद्यार्थ्याच्या संपर्कात आले असून या सर्वांचाच शोध आता सुरू करण्यात आला आहे. या सर्वांची येत्या काळात तपासणी करण्यात येणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times