हायलाइट्स:

  • जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का
  • अनेक नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • अजित पवारांच्या उपस्थितीत झाला प्रवेश सोहळा

जळगाव : जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठं खिंडार पडलं असून अनेक नगरसेवकांनी (भाजप नगरसेवक) आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भुसावळ येथील भाजपचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह २१ नगरसेवक, सावदा पालिकेच्या नगराध्यक्षा अनिता येवले यांच्यासह ८ नगरसेवक तर फैजपूर पालिकेतील नगरसेवक हेमराज पाटील यांनी पत्नी माजी नगराध्यक्षा अमिता चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse News Today) यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. अशातच अनेक नगरसेवकांना राष्ट्रवादीत घेत खडसे यांनी भाजपला धक्का दिला आहे. हा प्रवेश सोहळा भुसावळ शहरात राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आज शुक्रवारी पार पडला.

‘मातोश्री’ने पंख छाटले, रामदास कदम थेट मुंबईला निघाले; पत्रकारपरिषदेत करणार मोठा खुलासा

जळगाव जिल्ह्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा झाला. भुसावळ इथं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण तसंच विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानतंर आंबेडकर मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात भाजपच्या अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या मेळाव्याप्रसंगी माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार कैलास पाटील, डॉ. सतीश पाटील, मनीष जैन, रोहिणी खडसे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

अजित पवारांकडून खडसेंवर स्तुतीसुमने

या मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘जळगाव जिल्हा अनेक गोष्टींसाठी प्रसिध्द आहे, विशेष म्हणजे सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. जळगावचं बावनकशी अस्सल सोनं समजलं जात. मात्र, जळगावच्या या शुद्ध सोन्याची किंमत सर्वांनाच कळते असं नाही. त्यात जळगावचे सुपुत्र व राज्याचे नेते एकनाथ खडसे यांच्यासारख्या बावनकशी व्यक्तिमत्वाचं महत्व त्यांची किंमत राष्ट्रवादीला कळाली आणि आमच्या शब्दाला मान देवून खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे. कधीकाळी जळगाव जिल्ह्यात आपले सहा आमदार निवडून आले होते. त्यानतंर राज्यात व जिल्ह्यात आपण कमी पडलो असलो तरी आता एकनाथ खडसे यांच्या आगमनामुळे आपली स्थिती बदलली आहे. त्यामुळे आता सर्वांना सोबत घेवून अवघा जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमय करावा,’ असं आवाहनही अजित पवार यांनी केलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here