: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करत येत नसल्याने काही संपकरी कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्याही केली. तसंच या संपादरम्यान काही कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशातच धुळे शहरातील संजय सोनवणे या वाहकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ()

एसटी कर्मचाऱ्याच्या निधानानंतर संतप्त नातेवाईक आणि आंदोलक कर्मचाऱ्यांनी सोनवणे यांचा मृतदेह धुळे विभागीय नियंत्रक कार्यालयात आणला. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. लेखी स्वरुपात निवेदन दिल्यानंतर आणि पोलिसांनी समजूत घातल्यानंतर नातेवाईकांनी सोनवणे यांचा मृतदेह परत नेला.

संजय सोनवणे यांना गुरुवारी विभागीय कार्यालयातून बढतीच्या पडताळणीसाठी हजर राहण्याबाबत फोन करण्यात आला होता. एकीकडे मेस्मा अंतर्गत कारवाईची बातमी आणि दुसरीकडे कार्यालयातून आलेला फोन यामुळे सोनवणे तणावात होते. या तणावामुळेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. सोनवणे यांच्या मृत्यूनंतर आंदोलक चांगलेच आक्रमक झाले होते.

दरम्यान, शासन व प्रशासन दोघे आंदोलक कर्मचाऱ्यांच्या जिवावर उठल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here