मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्यरात्रीपासून पुढील २१ दिवस देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पंतप्रधानांशी संपर्क साधून चर्चा केली. या चर्चेनंतर राज्यात जीवनावश्यक सोयी व सुविधा सुरूच राहणार, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले जे नियम आहेत ते पुढेही तसेच राहणार आहेत. जीवनावश्यक सोयी व सुविधा सुरूच ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणीही गोंधळू नये, घाबरु नये आणि रस्त्यावर, दुकानांत, बाजारपेठेत गर्दी करू नये.’

जीवनावश्यक सुविधा मिळणार असल्या तरी त्यासोबतच करोनाचं संकट फार गंभीर आहे, याचे भान सर्वांनीच राखले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मी सुद्धा क्षणभर चरकलो!

पंतप्रधानांचे निवेदन ऐकल्यानंतर मीसुद्धा क्षणभर चरकलो. घराबाहेर पडायचेच नाही, हे ऐकून काळजाचा ठोका चुकला. म्हणून पंतप्रधानांचं निवेदन संपल्यानंतर काही वेळाने मी त्यांना फोन केला. अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तू सुरूच ठेवाव्या लागतील नाहीतर गोंधळ माजेल, असे मी त्यांना सांगितले. त्यावर त्यांनीही लॉकडाऊनबाबत तपशील सांगितला, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. युरोपमधील परिस्थितीची पंतप्रधानांनी मला कल्पना दिली. तशी स्थिती आपल्याकडे होऊ नये म्हणूनच ही खबरदारी घ्यायची आहे, असेही ते म्हणाले.

‘या’ सुविधा कधीही बंद केल्या जाणार नाहीत

मी आधीच सांगितल्याप्रमाणे, राज्यात अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक सेवा व सुविधा यापुढेही सुरू राहणार आहेत. त्यात औषध दुकाने, औषध निर्मिती कंपन्या, त्या कंपन्यांचे कर्मचारी, जीवनावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी, दूध पुरवठा, अन्नधान्याची वाहतूक, अन्नधान्याची दुकाने, भाजीपाला, अग्निशमन दल या सगळ्या गोष्टी सुरू राहणार आहेत. या सुविधा काहीही झाले तरी कधीही बंद केल्या जाणार नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला आश्वस्त केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप सुरू

महाराष्ट्र सरकार करोनाची इत्यंभूत माहिती देण्यासाठी व्हॉट्सअॅप चॅटबॉट ग्रुप सुरू करत आहे. या सेवेचा नंबर +९१२०२६१२७३९४ हा असेल. या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आल्यावर तुमच्या शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न असेल. सध्या इंग्रजीत ही सेवा असून लवकरच मराठी व अन्य भाषांत ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here