हायलाइट्स:

  • शाळेत विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट
  • मुख्याध्यापकासह पाच विद्यार्थ्यांना करोनाची लागण
  • खबरदारीचा उपाय म्हणून ही शाळा २३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय

अहमदनगर : राज्य सरकारने दक्षता घेऊन शाळा सुरू केल्या असल्या तरी शाळेत विद्यार्थ्यांना करोनाची लागण होण्याचे प्रकार शहरासोबतच ग्रामीण भागातही समोर येऊ लागले आहेत. पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकासह पाच विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षण विभागाने ही शाळा २३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेत अन्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांची चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. (शाळांमध्ये कोरोनाव्हायरस)

डमाळवाडी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे. तेथील मुख्याध्यापकांनी दोन दिवसांपूर्वी करोना चाचणी करून घेतली. तेव्हा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे अन्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांचीही चाचणी करण्याचा निर्णय झाला. त्यामध्ये पाच विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह आढळून आले, तर १५ विद्यार्थी आणि शिक्षकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता खबरदारी म्हणून त्यांच्या पालकांचीही चाचणी करण्यात येणार आहे, असं जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. बाधित आढळून आलेल्या मुख्याध्यापकासह पाचही विद्यार्थी ठणठणीत आहेत. त्यांच्यावर नियमानुसार उपचार आणि दक्षता घेणे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच शाळांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बंगळूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, शिवप्रेमी आक्रमक

करोना संसर्गाच्या भीतीमुळे शाळा सुरू करण्यास सरकार आणि शिक्षण विभाग धजावत नव्हते. दबाव वाढल्यानंतर अलीकडेच शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. मात्र, त्यासाठी नियम ठरवून देण्यात आले. शिक्षकांचे लसीकरण, करोना चाचणी यासह अन्य उपाय सक्तीचे करण्यात आले. त्यानुसार सध्या ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. देशातील काही शहरांमध्ये एकाच शाळेतील विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर मुंबईतील शाळेतही अशी घटना घडली होती. आता ग्रामीण भागातील शाळेतही शिक्षक आणि विद्यार्थी बाधित आढळून आले आहेत.

ग्रामीण भागातील शाळा शहरांच्या आधीच सुरू झाल्या आहेत. मधल्या काळात नियमांचे पालन करण्यात शिथीलता आल्याचे दिसून येत होते. मात्र, ओमिक्रॉनचा धोका वाढल्याने पुन्हा सर्वजण सावध झाले आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत शाळा बंद असतानाही नगर जिल्ह्यात लहान मुलांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण लक्षणीय होते. या पार्श्वभूमीवर सर्वच शाळांना दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here