हायलाइट्स:
- मूकबधीर अल्पवयीन मुलीवर बलात्कार
- नराधमास २० वर्ष कारावासाची शिक्षा
- तीन वर्षांपूर्वी घडली होती घटना
फिर्यादी पीडित अल्पवयीन मुलीचे वडील २०१८ मध्ये त्यांच्या कुटुंबासह कुपवाड एम. आय. डी. सी. मधील विमल सिमेंट पाईप कंपनीत काम करत होते. त्यावेळी आरोपी बलरामकुमार गौतम हा देखील त्याच कंपनीत कामाला होता. फिर्यादी यांची मुलगी ही मूकबधीर होती. मुलीचे वडील आणि आई कंपनीत कामासाठी गेल्यानंतर गौतम याने खाऊचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले.
वारंवार अत्याचार केल्याने मुलगी गर्भवती झाली. अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस येताच मुलीच्या वडिलांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करून आरोपी गौतम याला अटक केली होती. तत्कालीन तपास अधिकारी एस. ए. शेवाळे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्यानंतर विशेष सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली. सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले, तर आरोपीतर्फे दोन साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षीरांच्या साक्षी आणि पुराव्याच्या आधारे आरोपी बलरामकुमार रामविलास गौतम याला भारतीय दंड संहिता कलम ३७६ (२) (एल) (एन) व पोक्सो कायद्याचे कलम ६ अन्वये दोषी धरुन २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.