हायलाइट्स:
- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती
- अलिबागमधील चोंढी येथे ओबीसी समाजबांधवांचे आंदोलन
- केंद्र आणि राज्य सरकारवर आरोप
- ओबीसी समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल, आंदोलकांचा इशारा
एका बाजूला ग्रामपंचायत, नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, ओबीसींच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाल्यावरून आक्रमक झालेल्या समाजबांधवांनी काल, शुक्रवारी अलिबाग तालुक्यातील मांडवा अलिबाग रस्त्यावर चोंढी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाकडून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष राजू साळुंके यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली.
राज्य सरकारनं ठरवले असते तर महिनाभरात इम्पिरिकल डाटा तयार करू शकले असते. मात्र हे सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे. त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. ते वाचवण्यासाठी हे आंदोलन आहे. सरकारच्या भूमिकेचा आम्ही निषेध करत आहोत, असे साळुंके म्हणाले. आज राजकीय आरक्षण गेले, उद्या शैक्षणिक, नोकरीविषयक आरक्षण सुद्धा जाईल, अशी आम्हाला भीती आहे. तेव्हा नव्याने जनगणना होत नाही, तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन आपण आपली ताकद दाखवली तर, शासनाला नक्की जाग येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ओबीसींमध्ये सगळ्यात जास्त माळी समाज, नंतर धनगर, वंजारी असे अनेक समाज प्रामुख्याने आहेत. तसेच राज्याच्या ओबीसी सेलमधील पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन साळुंके यांनी केले. आमच्या मागण्याचा विचार न झाल्यास संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.