हायलाइट्स:
- बंगळुरूत शिवपुतळ्याची विटंबना
- घटनेचे मिरजेत उमटले पडसाद
- कन्नड फलकांची तोडफोड, वाहनांवरही दगडफेक
बंगळुरू इथं शुक्रवारी काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मिरज शहर शिवसेनेच्या वतीने बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. आज सकाळीच शिवसैनिकांनी मिरजेतील कानडी फलकांची तोडफोड केली. हॉटेल, हॉस्पिटल, मेडिकल यासह ज्या ज्या ठिकाणी कानडी बोर्ड होते ते काढून संबंधित दुकान मालकांना मराठी फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कर्नाटकमधून आलेल्या काही वाहनांचीही शिवसैनिकांनी तोडफोड केली. अचानक घडलेल्या या सर्व प्रकारामुळे मिरजेत तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने धाव घेऊन शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी नऊ शिवसैनिकांना अटक केली आहे. विजय शिंदे, चंद्रकांत मैंगुरे, पप्पू शिंदे, अतुल रसाळ, महादेव हुलवान, किरण कांबळे, गजानन मोरे आणि प्रकाश जाधव अशी अटक केलेल्या शिवसैनिकांची नावे आहेत.
दरम्यान, मिरजेसह जत, सांगली, इस्लामपूर, विटा या शहरांमध्येही कर्नाटक सरकारच्या विरोधात विविध पक्ष आणि संघटना रस्त्यावर उतरत आहेत. कर्नाटक सरकारने तातडीने समाजकंटकांना अटक करून, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे.