हायलाइट्स:
- कल्याण रेल्वे यार्डात रुळांवर मजुराला लुटण्याचा प्रयत्न
- रेल्वेच्या मजुरावर तिघांनी केला हल्ला
- मारहाण करून आरोपी झाले फरार
- रेल्वे पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात, एक फरार
कल्याण पूर्व भागातील रेल्वे यार्डात देविदास भले हा तरूण शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास काही काम करीत होता. या दरम्यान तीन तरुण त्याच्याजवळ आले. या तिघांनी देविदास याची जबरदस्तीने झाडाझडती सुरू केली. या दरम्यान देविदास याने जोरदार प्रतिकार केला. त्याचा प्रतिकार पाहून हे तिघे आणखीन चिडले. तिघांनी देविदास याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला.
जखमी देवीदास याने बचावसाठी आरडाओरडा केला. हे पाहून तिघे पळायला लागले. यातील एकाला काही नागरिकांनी पकडले. त्याला कल्याण जीआरपीच्या ताब्यात दिले. याबाबत पोलिसांनी अल्पवयीन आरोपीकडे चौकशी केली. त्याने इतर साथीदारांची नावे सांगितली. सध्या अल्पवयीन आरोपीची भिवंडी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. यातील दुसरा आरोपी सद्दाम शेख याला अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.