हायलाइट्स:
- समीर वानखेडे यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती
- याप्रकरणात आर्यन खान तब्बल महिनाभर तुरुंगात होता
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा दावा केला होता
बॉलीवूड सेलिब्रिटींविरुद्धच्या धडक कारवाईमुळे समीर वानखेडे यांची एनसीबीतील कारकीर्द चांगलीच गाजली. समीर वानखेडे यांनी एनसीबीचे विभागीय संचालक म्हणून २०२० मध्ये एकूण ९६ जणांना अटक केली होती. यापैकी २८ जणांविरोधात गुन्हे दाखल झाले होते. तर २०२१ साली समीर वानखेडे यांनी २३४ जणांना अटक केली. यापैकी ११७ जणांविरोधात गुन्हे दाखल झाले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या कारवायांमध्ये तब्बल १७९१ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी घडलेल्या क्रुझ ड्रग्ज प्रकरणामुळे ते आणखीनच प्रकाशझोतात आले होते. त्यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. मात्र, याप्रकरणाला नंतर वेगळेच वळण लागले. याप्रकरणात आर्यन खान तब्बल महिनाभर तुरुंगात होता. या काळात समीर वानखेडे यांनी शाहरुख खानला लक्ष्य करण्यासाठी हेतूपूर्वक ही कारवाई केल्याचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणातील पंच असलेल्या व्यक्तींवरही अनेक दोषारोप झाले होते. प्रभाकर साईल नावाच्या एका पंचाने तर समीर वानखेडे यांनी शाहरुख खान याच्याकडून खंडणी उकळण्यासाठी ही कारवाई केल्याचा धक्कादायक आरोप केला होता. त्यामुळे समीर वानखेडे अडचणीत आले होते. त्यानंतर एनसीबीने त्यांना दिल्लीला बोलावून त्यांची अंतर्गत चौकशीही केली होती.
याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा दावा केला होता. समीर वानखेडे हे मुस्लीमधर्मीय असूनही नोकरी मिळवण्यासाठी त्यांन अनुसूचित जातीचा असल्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणात बरेच आरोप-प्रत्यारोप झाले होते. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र, यामुळे समीर वानखेडे यांच्या सचोटीविषयी अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या.