हायलाइट्स:
- शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे पडसाद
- कर्नाटकातील मंत्री शशिकला जोल्ले यांच्या बांधकाम प्रकल्पाचे काम बंद पाडले
- कर्नाटक सरकारने माफी मागावी, अशीही केली मागणी
बंगळुरू येथे दोन दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. त्याचे पडसाद शनिवारी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उमटले होते. बेळगाव आणि सीमाभागातही या घटनेचा मराठी बांधवांनी जोरदार निषेध केला. कोल्हापुरात निदर्शने करतानाच कर्नाटकातील खासगी वाहनावर दगडफेक करून मोडतोड करण्यात आली.
रविवारी दुपारी कोल्हापुरात शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी मंत्री जोल्ले यांचे बांधकाम बंद पाडले. मंत्री जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचे कोल्हापूर येथील शाहू नाका येथे व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू आहे. तेथे जाऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कामगारांना हुसकावून लावले. जोपर्यंत कर्नाटक सरकार माफी मागत नाही, दोषींवर कारवाई करत नाही, तोपर्यंत हे काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
दरम्यान, हर्षल सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात प्रदीप हांडे, शुभम जाधव, प्रणव पाटील, संकेत खोत, युवराज हल्दीकर, आकाश जाधव, अतुल सांगावकर, सुरज एकशिंगे, मंगेश शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.