हायलाइट्स:
- किरीट सोमय्या यांचे पवार कुटुंबियांवर गंभीर आरोप
- रोहित पवार यांनीही दिलं उत्तर
- सोमय्यांच्या आरोपांची उडवली खिल्ली
‘हिंदी चित्रपटात मनोरंजनासाठी अधूनमधून जसे आयटम साँग असते, तशीच सोमय्या यांच्या आरोपांची स्थिती आहे,’ अशा शब्दांत रोहित पवार यांनी सोमय्यांच्या आरोपांची खिल्ली उडवली.
कर्जत नगरपंचायतीची निवडणूक यंदा चांगलीच गाजली आहे. भाजपकडून प्रचारासाठी सोमय्या कर्जतला आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसह पवार कुटुंबियांवर आरोप केले. ते म्हणाले की, ‘नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जावयामार्फत मोठा गैरव्यवहार केला आहे. त्यांना एक दिवस जेलमध्ये पाठवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. जरंडेश्वर कारखान्याचा नेमका बाप कोण आहे, हे मी अजित पवारांना अनेक वेळा विचारले, परंतु याचे उत्तर त्यांनी दिले नाही,’ असं सांगून सोमय्यांनी आघाडी सरकारवरही आरोप केले.
रोहित पवारांचा जोरदार पलटवार
किरीट सोमय्या यांच्या आरोपांना रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले. ते म्हणाले, किरीट सोमय्या म्हणजे मनोरंजन झाले आहे. हिंदी चित्रपटांमध्ये काहीतरी मनोरंजन करण्यासाठी असावं म्हणून जाणीवपूर्वक आयटम साँग असतं. तसाच काहीसा प्रकार किरीट सोमय्या यांचा झालेला आहे. राज्यात अनेक जण पवार कुटुंबियांवर आणि खास करून शरद पवार यांच्यावर आरोप करून मोठे होण्याचा प्रयत्न करत आहेत. तसाच प्रयत्न सोमय्या करीत आहेत का, असा संशय मनामध्ये निर्माण होत आहे. भाजपच्या सभेत कर्जतकरांचे ग्रामदैवत संत गोदड महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करताना सोमय्या यांना दोन पावले चालवेना झाले. संयोजकांनी खुर्चीसह गोदड महाराज यांची प्रतिमा सोमय्या यांच्यासमोर आणली व प्रतिमा पूजन करून तशीच आडबाजूला ठेवली. यामुळे आम्हा सर्व नागरिकांचा अवमान झाला आहे. सोमय्या देवापेक्षा मोठे झाले आहे का?’ असा सवाल आमदार पवार यांनी केला.
‘…म्हणून त्यांना उमेदवार अज्ञात स्थळी घेऊन जाण्याची वेळ आली’
‘कर्जत नगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजपा शहराध्यक्ष उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी कोणालाही न सांगता अर्ज मागे घेतो. त्यांचे उमेदवार अर्ज मागे घेऊ नये म्हणून त्यांना अज्ञात स्थळी घेऊन जाण्याची वेळ येते. यावरून त्या उमेदवारांना आपला पराभव समोर दिसत आहे, हे लक्षात येते. त्यामुळे विनाकारण आमच्यावर दडपशाहीचा आरोप करायचा हे कितपत योग्य आहे? त्यासाठी केवळ स्टंट निर्माण करण्याचे काम करण्यात आले. याचं मला खूप वाईट वाटलं,’ असंही रोहित पवार म्हणाले.