हायलाइट्स:
- भरती परीक्षा गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे
- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी
- शिवसेनेतील संघर्षावरही केलं भाष्य
‘फेस एडिटर’ संजय राऊत हे शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे प्रवक्तेही आहेत. शिवसेनेत सबकुछ राऊतच आहेत. दिवाकर रावते, अनिल देसाई या सर्वांना बाजूला सारून पक्ष चालवला जात आहे. रामदास कदम यांनी व्यक्त केलेली नाराजी ही तर सुरूवात आहे,’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
‘देवेंद्र फडणवीस यांची ती मागणी योग्यच’
राज्यातील सरकारी नोकरभरतीच्या पेपरफुटीची आणि परीक्षांमधील घोटाळ्यांची सीबीआयमार्फत चौकशी करावी, ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी योग्यच असल्याचं सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली आहे. या घोटाळ्यांचे धागेदोरे राज्य सरकारपर्यंत जात असल्याने सीबीआयनेच याची चौकशी करणे योग्य ठरेल, असंही ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘आरोग्य विभाग, म्हाडा आणि आता शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळ्यांचे धागेदोरे राज्य सरकारपर्यंत जात असल्याने त्याची चौकशी करण्यास त्याच्यावर असलेली संस्था पाहिजे. जे आरोपी तेच न्यायाधीश असं होऊ शकत नाही. त्यामुळे फडणवीस यांनी केलेली सीबीआय चौकशीची मागणी योग्य आहे. भाजपा ही मागणी रेटून धरेल.’
‘महाविकास आघाडीने तीन वेळा निवडणूक टाळली’
‘राज्यपालांनी सांगिल्याच्या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक घ्यायची असते. पण महाविकास आघाडीने तीन वेळा अशी निवडणूक टाळली. या सरकारने राज्यपालांचे कुलगुरू नियुक्तीचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतला. शिक्षणमंत्र्यांसाठी नवे पद निर्माण करून त्याचा दर्जा कुलगुरुंच्या वरती असावा असाही निर्णय या सरकारने घेतला. ज्या कारणांसाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जाते त्यापैकी आता कोणतेही बाकी नाही,’ अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. इंदिरा गांधी यांनी किंवा काँग्रेसने ज्या प्रकारे अनेकदा विविध राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली त्या पद्धतीने भाजपचे नेतृत्व निर्णय घेत नाही, असंही ते म्हणाले.
सुभाष देसाई यांच्यावर पलटवार
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राज्यातील उद्योग पळवल्याचा मोघम आरोप करू नये तर निश्चित माहिती दिली तर त्याचे उत्तर देता येईल, असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करा या मागणीसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर आगामी विधिमंडळ अधिवेशनात भाजपा आवाज उठवेल, असंही पाटील यांनी सांगितलं.